धोकादायक विजेचे पोल काढावेत; स्थानिकांची मागणी

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमधील अनेक ठिकाणी भूमीगत विजेच्या जोडण्या केलेल्या असून, ज्याठिकाणी वापराविना उभे असणारे जुने गंजलेल्या अवस्थेतील विजेचे अत्यंत धोकादायक पोल त्वरित काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.

माथेरानला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असून, वादळी वार्‍याने याच विजेच्या खांब्यावर अनेकदा झाडे उन्मळून पडत असल्यामुळे पादचार्‍यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. भूमीगत विजेच्या केबल्स टाकण्यात आल्याने गावातील विविध भागात उभे असलेले हे विजेचे पोल रहदारीसाठी सुध्दा अडसर ठरत आहेत. मुख्य रस्ता असणार्‍या महात्मा गांधी मार्गावरील बहुतेक ठिकाणी अशा प्रकारचे पोल गंजलेल्या अवस्थेत दिसत आहेत. ई-रिक्षा स्टँडच्या बाजूला भले मोठे विजेचे गंजलेले पोल खूपच धोकादायक असून, केव्हाही वार्‍याने पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी संबंधित खात्याने याकडे लक्ष केंद्रित करावे जेणेकरून संभाव्य धोका टळू शकतो.

पावसाळ्यात निश्‍चितच हे जुने पोल पडण्याची शक्यता आहे. याकामी आम्ही हे पोल काढण्याबाबत वरिष्ठांना लेखी पत्र दिलेले आहे. आमच्याकडे मनुष्यबळ कमी असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने अपुरा कामगार वर्ग वीजपुरवठा सुरू करण्यात व्यस्त असतो.

संतोष पादिर,
सहाय्यक अभियंता, माथेरान

Exit mobile version