आवर्ती, अनावर्ती खर्चास शासनाची मान्यता; विमानतळ परिसरात स्वतंत्र ठाण्याला मंजुरी
| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने आता स्वतंत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे स्थापन होणार आहे. राज्य शासनाने या नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीला मंजुरी दिली असून, त्यासाठी विविध संवर्गातील एकूण 108 निर्माण करण्यात येणार आहेत. या पोलीस ठाण्यासाठी 3.38 कोटी रुपये आवर्ती व 1.76 कोटी रुपये अनावर्ती खर्चासही शासनाने मान्यता दिली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पनवेल शहर विभाजन करून हे नवीन पोलीस ठाणे स्थापन केले जाणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 फेब्रुवारी 2018 रोजी कोंबडभुजे येथे पार पडला होता. विमानतळाचे बांधकाम पाच टप्प्यांमध्ये पूर्ण होणार असून, येथे 4 प्रवासी टर्मिनल्स, 2 रनवे, 1 कागों ट्रक टर्मिनल आणि संरक्षण तसेच नागरी हवाई वाहतूक विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक वर्षी 9 कोटी प्रवासी आणि 360 कोटी मेट्रिक जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे वाहतूक आणि सुरक्षा लक्षात घेऊन या ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. दरम्यान, जुलै महिन्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्रचनेत परिमंडळ-1 (वाशी) व परिमंडळ-2 (पनवेल) यांच्या पुनर्रचनेतून नवे तिसरे परिमंडळ-2 (बेलापूर) स्थापन करण्यात आले आहे. याच पुनर्रचनेत विमानतळ आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार राज्याच्या गृह विभागाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे. त्याबाबतचा जीआरदेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
108 पदांचा समावेश
शासन निर्णयानुसार, या नवीन पोलीस ठाण्यामुळे पनवेल, उलवे आणि नव्याने स्थापन होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्द निश्चितीचा प्रस्ताव नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून लवकरच शासनास सादर करण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यातच विमानतळ पोलीस ठाण्याची निर्मिती विमानतळ परिसराच्या सुरक्षेला आणि कायदा-सुव्यवस्थेला नवी बळकटी देणारी ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदामध्ये पोलीस निरीक्षक 2, सहाय्यक पोलीस निरीक्षक 3, पोलीस उप निरीक्षक 6, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 6, पोलीस हवालदार 27, पोलीस शिपाई 42, महिला पोलीस शिपाई 19 व चालक पोलीस शिपाई 3 अशा एकूण 108 पदांचा समावेश आहे.
