पनवेल स्थानकात स्वतंत्र फलाटाचे काम अंतिम टप्प्यात
| पनवेल | प्रतिनिधी ।
बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावरील कामांना आता वेग आला असून, या मार्गावर प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून तयारीला वेग आल्याचे चित्र आहे. पनवेल रेल्वे स्थानकात कर्जतच्या दिशेने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी स्वतंत्र फलाट उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पनवेल-कर्जत रेल्वे सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
पनवेल स्थानक परिसरात नव्या फलाटाचे काम वेगाने सुरू असून, प्रवाशांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणीही करण्यात येत आहे. नव्या पादचारी पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, त्यावर छत उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी स्वयंचलित जिने बसविण्याचे कामही सुरू झाले आहे.
पनवेल-कर्जत रेल्वे मार्गामुळे पनवेल, कर्जत तसेच परिसरातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या भागातील प्रवाशांना विविध मार्गांचा वापर करून प्रवास करावा लागत असल्याने पनवेल-कर्जत थेट रेल्वे सेवेची मोठी प्रतीक्षा आहे. पनवेल स्थानकातील सुरू असलेल्या कामांची प्रगती पाहता रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारीला वेग आल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबरपर्यंत स्थानकातील संबंधित कामे पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यानंतर पनवेल-कर्जत रेल्वे सेवा सुरू होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नवीन रेल्वे सेवा सुरू झाल्यास पनवेल-कर्जत प्रवास अधिक सुलभ आणि जलद होण्याबरोबरच या भागातील दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या मार्गाच्या पूर्णत्वाकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.






