महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
| पनवेल | प्रतिनिधी ।
नवीन पनवेल सेक्टर-2 येथील जय अंबे माता मंदिरासमोरील गटारीवरील झाकण गायब झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी ये-जा करत असताना उघडी गटार आणि फूटपाथवरील अतिक्रमण यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या गटारीतून महावितरणच्या विद्युत केबल टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. गटारीचे झाकण नसल्याने या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाळ्यात गटारीत पाणी साचल्यास धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या परिसरातून डीएव्ही स्कूल आणि शांती निकेतन स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र, फूटपाथवर सध्या बंद असलेल्या टपऱ्यांनी अतिक्रमण केल्याने विद्यार्थ्यांना पादचारी मार्गाचा वापर करता येत नाही. परिणामी त्यांना महावितरणच्या धोकादायक डीपीजवळून मार्ग काढावा लागत आहे. गटारीचे झाकण गायब असल्याची तसेच फूटपाथवरील अतिक्रमणाची माहिती महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने तातडीने गटारीवर नवीन झाकण बसवावे, फूटपाथवरील अतिक्रमणे हटवावीत आणि महावितरणच्या डीपी परिसराची सुरक्षा तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





