युद्धपातळीवर सुरू आहे आंबा घाटाची दुरुस्ती

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणार्‍या आंबा घाट रस्त्याचे राज्यात जुलै महिन्याच्या कालावधीत झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, सद्यःस्थितीत त्याच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
या वर्षातील अतिमुसळधार पावसाचा जबरदस्त तडाखा रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. सह्याद्रीच्या खोर्‍यात अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे यासारखे प्रकार घडले.
आंबा घाटातील परिस्थिती अत्यंत गंभीर होतील. डोंगरातून आलेल्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर दगड-माती रस्त्यावर वाहून आली. बारा ठिकाणी असे प्रकार घडले. त्यातील तीन ठिकाणी खोल दरीच्या बाजूने अर्धा रस्ता खचला होता. यामुळे येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली. दगड-माती बाजूला केल्यानंतर दुचाकी, चारचाकीसाठी मार्ग खुला केला. पाऊस थांबल्यानंतर डोंगराच्या बाजूने सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधून वीस टनी वजनाच्या गाड्या घाटातून सोडण्यास सुरवात झाली. कोल्हापूर-रत्नागिरीला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे याची डागडुजी लवकरात लवकर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामुळे पावले उचलण्यात येत आहे. सध्या आंबा घाटात दरीच्या बाजूने कोसळलेल्या भाग दुरुस्त केला जात आहे. भविष्यात पावसाळ्यामध्ये पुन्हा धोका निर्माण होऊ नये, यासाठी तळातील भागात गॅबियन प्रकारचा बंधारा टाकला जाईल. त्यावर सिमेंट काँक्रिटची भिंती बांधण्यातयेणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून युद्धपातळीवर आंबा घाट दुरुस्तीचे काम सुरू आहे. भविष्यातील संभाव्य धोके टाळून, वाहतूकीच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर बनविण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे असे मत प्राधिकरणाचे वसंत पंदेरकर यांनी मांडले आहे.

Exit mobile version