| कल्याण | वार्ताहर |
मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्टेशन दरम्यानच्या मार्गावरील महावितरणच्या एकमेव 22 केव्ही उपरी रेल्वे क्रॉसिंग वीजवाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम दोन तासात पूर्ण करण्यात आले. महावितरणच्या डोंबिवली विभागाने रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा सुयोग्य उपयोग करत जीर्ण झालेली वाहिनी मजबूत केली.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा आणि कर्जत मार्गावरील नवापाडा वगळता सर्व उपरी वीजवाहिन्या रेल्वेने भूमिगत केल्या आहेत. मात्र या मार्गावरील डोंबिवली ते ठाकुर्ली मार्गा दरम्यानची नवापाडा रेल्वे क्रॉसिंग वीजवाहिनी अद्यापही भूमिगत झालेली नाही. ही वाहिनी भूमिगत करण्यासाठीचे पैसे भरून व मंजुरी मिळूनही ऑक्टोबर 2014 पासून रेल्वे प्रशासनाकडून काम प्रलंबित आहे. महावितरणच्या डोंबिवली विभागाकडून या कामासाठी नियमितपणे पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान जीर्ण झालेल्या या वीजवाहिनीमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी डोंबिवली विभागाने रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा उपयोग करून वाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम केले.
रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने 7 मे रोजी पहाटे एक ते पाच दरम्यान या जीर्ण वाहिनीची दुरुस्तीची कामे दोन तासात पुर्ण करण्यात आली. यावेळी डोंबिवली पश्चिम परिसराचा वीजपुरवठा पर्यायी वाहिनीवरून अखंडितपणे चालू राहील याची काळजी घेण्यात आली. कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पराग उके यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंते संजय सोनवणे, तुषार सातकर, चेतन तेलघरे, तांत्रिक कर्मचारी नामदेव भल्ला, अमित पाटिल, अशोक कानडजे, सतीश जागले, भारत गांगुर्डे, सुनील धिंदले तसेच दीप्ती इलेक्ट्रिकल व निशि इलेक्ट्रिकल या कंत्राटदारांच्या कामगारांनी ही कामगिरी केली.