आदई ते सुकापूर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा

शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी यांची मागणी
। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक ये-जा करण्यासाठी आदई सर्कल आणि सुकापूर मार्गाचा वापर करतात. नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी दर्जात्मक रस्ते बनवणे गरजेचे आहे. परंतु, आदई सर्कल ते सुकापूर मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, या मार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. या अनुषंगाने रस्त्याचे काम करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना लवकरात लवकर आदेश द्यावेत, अशी मागणी शेकापचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी यांनी पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबत त्यांनी सा.बां. विभागाशी पत्रव्यवहारदेखील केला आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, अनेक दिवसांपासून आदई सर्कल ते सुकापूर बस स्टॉपपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ता नादुरूस्त झालेला आहे. या रस्त्यावरुन जाणे अत्यंत धोकादायक असून, अपघाताला आमंत्रण देत आहे. या खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना, वाहनचालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते.

हा रस्ता हा पनवेल सार्वजनिक बांधकाम अखत्यारित येत असून, दरवर्षी या रस्त्याची दुरवस्था होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सा.बां. विभागाच्या स्तरावर होणे गरजेचे आहे. सध्या पावसाळा सुरू असून, अनेक सण-उत्सव तोंडावर आले असून, या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांमध्ये मोठा उद्रेक झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना देऊन त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, असे राजेश केणी यांनी सा.बां. विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याबाबत म्हटले आहे.

याबाबत पीडब्ल्यूडीचे अधिकारी श्री. बरबाडे व श्री. टिळे यांच्याशी रस्त्याच्या बिकट अवस्थेबाबत चर्चा करून रस्त्याची झालेली दयनीय अवस्था निदर्शनासही आणून दिली आणि याबाबत उपाययोजना करण्याची मागणीही केली. या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आश्‍वासन या अधिकार्‍यांनी दिले. तसेच याबाबत वाहतूक विभाग आणि खांदेश्‍वर पोलिसांनाही कळवण्यात आल्याचे राजेश केणी यांनी सांगितले.

Exit mobile version