। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर मुळपाडा दाखोडी या ग्रामीण वसाहतीत उभारण्यात आलेला विजेचा खांब रविवारी (दि. 25) वादळी पावसात दुपारी दोनच्या सुमारास कोसळला. त्यामुळे मुळपाडा दाखोडी वसाहतीमध्ये काळोखाचे साम्राज्य पसरले होते. दरम्यान वीज वितरण कंपनी विरोधात येथील नागरिकांचा संताप बघून, महावितरण कंपनीने तातडीने विद्युत पोल उभा करण्याचा निर्णय घेतला. संबंधित वीज वितरण कंपनीची संपूर्ण टीम उपस्थित राहून दाखोडी येथे कोसळून पडलेला विद्युत पोल सोमवारी (दि.26) उभा केला. त्यामुळे विद्युत पुरवठा पूर्ववत सुरळीत झाला आहे.
याबाबत सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी यांनी चिरनेर महावितरण कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता वर्षा मगर यांच्याशी संपर्क साधून, त्यांना या घटनेची माहिती दिली. मात्र कनिष्ठ अभियंता वर्षा मगर यांनी कोसळून पडलेला पोल उभा करण्यासाठी विद्युत मटेरियल व कामगार उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले. कोसळून पडलेला विद्युत पोल त्याच दिवशी तातडीने उभा करता आला नाही. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. त्याचबरोबर येथील नागरिकांना भर पावसाच्या दिवशी अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला.