दोघाजणांचे निलंबन, कारवाईवर असमाधानी-सर्वहाराची भुमीका
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोठडीत आरोपीच्या आत्महत्याप्रकरणी जबाबदार धरत रोहा पोलिसांवर कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची उचलबांगडी तर ठाणे अंमलदार सुनिल पाटील हवालदार प्रणीत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने जिह्यात एकच खळबळ उडाली. मात्र सर्वहारा जनआंदोलनाचे सोपान सुतार यांनी या कारवाईने आम्ही समाधानी नसून लवकरच पुढील भुमीका जाहीर करु असे सांगितले आहे.
पत्नीच्या हत्येप्रकरणी रोहा पोलीस कोठडीत अटकेत असलेला आरोपी रविंद्र वसंत वाघमारे याने 14 एप्रिलच्या पहाटे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलीस ठाण्यात तरुण आरोपीने आत्महत्या केल्याने कैद्यांच्या सुरक्षेवर चोहोबाजूने आरोप झाले. आरोपीने नेमकी का आत्महत्या केली, आत्महत्यामागे नेमके कारण काय ? असे अनेक सवाल उपस्थित झाले. आरोपीच्या आत्महत्याप्रकरणी विविध आदिवासी संघटनांनी पोलिसांना जबाबदार धरले. आदिवासी समाजाच्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. आरोपी कोठडीत असल्याने सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असते. त्यामुळे सबंधीत अधिकारी व कर्मचारी यांचा हलगर्जीपणा आहे, पोलिसांना जबाबदार धरत पोलीस निरीक्षक संजय पाटील, ठाणे अंमलदार यांना तात्काळ निलंबीत करा अशी आक्रमक मागणी सर्वहरा जनआंदोलनाने केली. अखेर कोठडीतील आरोपीच्या आत्महत्येला अप्रत्यक्ष जबाबदार धरत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी संबंधीत रोहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, कोठडीतील आरोपीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची तातडीने उचलबांगडी, ठाणे अंमलदार सुनिल पाटील, हवालदार प्रणीत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली. तर सबंधीत अधिकारी व कर्मचार्यांवर केलेल्या कारवाईने आम्ही समाधानी नाहीत, पुढची भूमिका लवकरच जाहीर करू अशी प्रतिक्रीया सर्वहारा जनआंदोलनांचे सोपान सुतार यांनी दिल्याने आरोपी आत्महत्या प्रकरण आता कोणत्या वळणावर थांबते ? हे पाहावे लागणार आहे.
आरोपी आत्महत्या प्रकरणी आम्ही मानवाधिकार संघटनेकडे कठोर कारवाईसाठी दाद मागू, त्या रात्रीचे फुटेज् तपासून पुढील भूमिका ठरवू अशी आक्रमक प्रतिक्रीया सर्वहारा जनआंदोलनाचे कार्यकर्ते सोपान सुतार यांनी सलाम रायगडला दिल्याने आदिवासी संघटना नेमके काय पवित्रा घेतात ? याकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रोहा पोलीस ठाण्याला 73 कर्मचारी नियुक्त संख्या आहे. केवळ 30 कर्मचारी सेवेत रुजू आहेत, त्यामुळे पोलिसांवर कामाचा मोठा ताण पडतो. रात्रपाळीला तीन ठाणे अंमलदार ऐवजी एक ठाणे अंमलदार सध्या कार्यरत असल्याचे यानिमित्त समोर आल्याने वरिष्ठ पोलीस प्रशासनाने याकडेही लक्ष घालावे ? असेही आता नागरिकांतून बोलले जात आहे.