नऊ गोवंशीय जनावरांची सुटका

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या दामत गावात बकरी ईदसाठी नेण्यात आलेली नऊ गोवंशीय जनावरे यांची सुटका करण्यात आली. दामत गावातील शब्बीर गुलामअली नजे याने आपल्या घराच्या गोठ्यात त्या नऊ गोवंशिय जनावरे दाटीवाटीमध्ये कोंडून ठेवले होते. दरम्यान, पोलिसांच्या खबऱ्याचे माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हा छापा टाकून नेरळ पोलिसांनी कारवाई केली.

रविवारी (दि.16) नेरळजवळील दामत गावातील शब्बीर गुलाम अली नजे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या गोठ्यात गोवंशीय जनावरे बांधली असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नेरळ पोलिसांनी दामत शब्बीर यांच्या घरी धाड टाकली. त्या धाडीमध्ये पोलिसांच्या पथकाने नऊ गोवंशीय जनावरांची सुटका केली. यात चार गाय वर्णीय तर तीन बैल जातीचे आणि प्रत्येक एक वासरू आणि कालवड यांची सुटका करण्यात आली. ही सर्व जनावरे कत्तलीसाठी आणलेली असून त्यांची बाजारभावातील किंमत किमान दीड लाख असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे करीत आहेत.

Exit mobile version