चिपळूण रेस्क्यू टीम ठरली देवदूत
| चिपळूण | प्रतिनिधी |
कोकणात मान्सून दाखल झाल्यावर पहिल्या दिवशीच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, चिपळूण तालुक्यातील खडपोली सोनारवाडी येथे चार व्यक्ती नदीपात्रामध्ये अडकल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.25) रात्री उशिरा घडली होती. या सगळ्या घटनेची तातडीने दखल घेत चिपळूण तालुका प्रशासनाचे प्रमुख प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका प्रशासन रेस्क्यू टीमने हे बचावकार्य चार तासांच्या अथक प्रयत्न करून पूर्ण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अडकलेल्या तीन नागरिकांमध्ये एक महिला, लहान मुलगा व एका व्यक्तीचा समावेश होता. हे सगळे पिंपळी खुर्द सोनारवाडी येथील नदीपात्रात मासेमारी करायला गेले होते. त्यावेळी अचानक पाणी वाढल्याने ते अडकले नदीपत्रात अडकले. मात्र, नदीपत्रात एक बेट असल्याने ते सुरक्षित उभे राहिलेे होते. यावेळी चिपळूण नगरपालिका आणि अग्निशमक विभाग रेस्क्यू टीम घटनास्थळी रात्री नऊच्या दरम्यान दाखल झाली होती. आपत्तीव्यवस्थापन टीममधील निखिल पवार, अजय कदम, आकाश कदम हे देखील दाखल झाले होते. चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांना या घटनेची माहिती समजतात त्यांनी तातडीने पाणी थांबवण्याच्या सूचना दिल्या. तात्काळ कोळकेवाडी येथून होणाऱ्या टप्पा एक व दोन बंद करून पाणी सोडण्याचे थांबवण्यात आले. त्यामुळे पाणी कमी झाल्यावर त्यांना सुरक्षित नदीपत्रातून बाहेर काढण्यासाठी रस्सी घेऊन रेस्क्यू टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली. पिंपळी येथील हे चौघेही अडकल्याने प्रचंड घाबरले होते. त्यामुळे वैद्यकीय पथकही तैनात ठेवण्यात आले होते. अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यासाठी चिपळूण येथील रेस्क्यू टीम शर्थीचे प्रयत्न केले. दैव बलवत्तर म्हणून हे तिघेही सुखरूप बचावले आहेत. संतोष पवार (40), त्यांची पत्नी सुरेखा पवार (35) व पुतण्या ओंकार पवार (17) अशी त्यांची नावे आहेत. चिपळूण रेस्क्यू टीमने या चौघांसाठी देवदूत ठरली आहे.
त्याचबरोबर महसूल, पोलीस, नगरपालिका, वैद्यकीय विभाग, महानिर्मिती व आपदा मित्र यांचे एकत्रित टीमवर्कचे चिपळूण तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असतानाही ते बचाव कार्यात दाखल झाले होते. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी रेस्क्यू टीमच्या कामाचा कस लागला होता. या सगळ्या प्रकारावर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व चिपळूण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने लक्ष ठेवून होते.