| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानच्या विकट गडावर (पेब किल्ला) अडकून पडलेल्या सात पर्यटकांची नेरळ पोलीस आणि आपत्कालीन सामाजिक संस्थांनी नऊ तासांनी सुखरूप सुटका केली आहे. हे पर्यटक ट्रेकिंगसाठी या किल्ल्यावर आले होते. त्यांच्यापैकी एका तरुणीला उन्हाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी हेल्पलाईन क्रमांकावर कॉल केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.
मुंबई पवई आणि परिसरात राहणारे तेजस ठाकरे, निकिता जॉबे, हिबा फातिमा, निखिल सिंग, सोनू साहू, चेतन पाटील, साहील लेले असा सात जणांचा कॉलेज ग्रुप माथेरानजवळील पेब किल्ला गड सर करण्याच्या हेतूने आला होता. यासाठी तरुण सकाळी ट्रेन पकडून नेरळ येथे आठ वाजता पोहोचले आणि त्यांनी ऑटो रिक्षा पकडून फणसवाडी या पेब किल्ल्याच्या गडाच्या पायथ्याला गेले होते. दरम्यान, पेब किल्ला चढण्यासाठी म्हणून पायवाटेने या तरुणांनी प्रवास सुरू केला असता, काही अंतर चालल्यानंतर तरुण पायवाट रस्ता हरवून बसल्याने या तरुणांना काही स्थानिकांनी आपण रस्ता चुकले म्हणून मार्गदर्शनही केले होते. त्यानंतरही हे तरुण वाट चुकल्याने यामधील एका तरुणीस उन्हाचा त्रास झाला, भोवळ आल्याने ती जागेवरच बसली. बॅगेत सोबत आणलेले पाणी, अन्न संपल्याने जंगलात कुठे पाणी मिळत नसल्याने, त्यानंतर या तरुणांनी 112 या हेल्पलाइन क्रमांकावर मदत मागितली होती. त्यानुसार नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी सह्याद्री आपत्कालीन सामाजिक संस्था माथेरान आणि स्थानिक ममदापूर वाडी येथील तरुणांना अडकलेल्या तरुणांच्या मदतीसाठी पाठवले.
दरम्यान, मदतीसाठी पोहोचलेल्या आपत्कालीन संस्थांनी या तरुणांना पाणी देत, धीर दिला. तब्बल नऊ तासानंतर या तरुणांची सुखरूप सुटका करीत सायंकाळी सहा वाजता गडाच्या खाली फणसवाडी येथे पोहोचवले. यावेळी सह्याद्री आपत्कालीन सामाजिक संस्था माथेरानचे वैभव नाईक, सुनील ढोले, चेतन कळंबे, अक्षय परब, सुनील कोळी, राहुल चव्हाण, राम निरगुडा, काळूराम दरोडा, विकी फाले, संदीप कोळी, महेश काळे, चेतन कळंबे या तरुणांनी पुढाकार घेऊन तरुणांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, अडकेलेल्या तरुणांच्या कुटुंबाला माहिती मिळताच त्यांची धावाधाव सुरू झाली होती, तर आपल्या मुलाला घेण्यासाठी खासगी वाहनाने नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचले होते.