| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच घेतल्या. 21 फेब्रुवारीला दहावीची परीक्षा सुरू झाली होती. ती मार्च महिन्यात संपली. आता निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना आहे. गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लवकर लावण्यात येत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर झाले होते. मात्र, यंदा आणखी लवकर म्हणजेच निकाल 15 मे पूर्वी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बोर्डाने विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आयोजन लवकर केल्याने परीक्षा लवकर संपल्या. त्यामुळे निकालही लवकर लावले जाणार आहेत. निकालानंतर जुलैच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षा होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दहावीचा निकाल मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. बोर्डाकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. राज्यातील 9 विभागीय मंडळांकडून दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवले गेले. संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते. तसंच परीक्षा केंद्राबाहेर भरारी पथकं, व्हिडीओ शूटिंग करण्यात आले. राज्यात दहावीच्या परीक्षेत 89 आणि बारावीच्या परीक्षेत 360 गैरप्रकारांची नोंद झाल्याची माहिती बोर्डाने दिली आहे.