| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
म्हसळा तालूक्यातील वाघाव बौध्दवाडी जवळील दुर्गम भागात चिखलात अडकलेल्या मरणासन्न झालेल्या बैलाला माणगाव मधील वन्यजीव अभ्यासकांनी जीवदान दिले आहे. शंतनु कुवेसकर व त्यांचे तीन मित्र सचिन वनारसे, परेश मोरे, सागर पाटील हे निसर्गरम्य परिसरात भटकंती करीत होते. म्हसळ्यातील वाघाव बौध्दवाडी जवळील दुर्गम भागातुन कच्च्या रस्त्यावरून आपल्या कारने जात असताना त्यांच्या नजरेस रस्त्यालगत जमिनीवर एका बैलाचे फक्त डोके आणि दोन शिंग हालताना दिसली. हे दृष्य पहाताच या चार मित्रांनी जवळील गावातील वस्ती कडे जात, येथील ग्रामस्थांकडे हा बैल कोणाचा आहे याची चौकशी केली.
गावातील रमेश मोरे, धोंडीराम मोरे यांनी या ठिकाणी धाव घेतली. त्यांचे पाठोपाठ बैलाचे मालक जगन महाडिक देखील येथे धावत आले. व त्यांनी हा आपला पोपट नामक बैल असल्याचे म्हटले. वाघाव गावातील तरुण मंडळी साहिल साळवी, सुमेश महाडिक, सुशांत महाडिक, साहिल जाधव, पियुष जाधव या ठिकाणी मदतीस धावून आले आणि सचिन वनारसे, सागर पाटील, परेश मोरे व शंतनु कुवेसकर यांच्या मदतीने प्रसंगावधान बाळगून त्यांनी कारच्या बोनेटला जाड दोर खंडाने बांधुन बैलास सुरक्षित ओढून खड्ड्यातून बाहेर काढले. हा बैल मलुल अवस्थेत पडुन राहीला. त्यास सचिन वनारसे याने आपल्या सोबत आणलेल्या बिसलरी बाटलीतील पाणी वापरुन स्वच्छ धुतले. खड्ड्यातून बाहेर काढून बैलाला बांधलेले दोरखंड सोडताच हा जमिनीवर निपचित पडलेला बैल थोड्या वेळात उठून उभा राहत चक्क धावू लागला.