| तळा | वार्ताहर |
तळा येथील तटकरे महाविद्यालयात डॉ. सी.डी. देशमुख यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी ( दि.14) सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत विद्यापीठस्तरीय रिसर्च फेस्टिव्हल डी.जी.टी. शोध- वेध चे आयोजन करण्यात आले आहे.
तळा हे डॉ.सी.डी.देशमुख यांचे मुळ गाव. आधुनिक भारताच्या उभारणीत डॉ.सी.डी. देशमुख यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. डॉ.सी.डी. देशमुख यांच्या स्मृती त्यांच्या मुळ गावी प्रेरणादायी स्वरुपात जपल्या जाव्यात, विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी, स्थानिक संशोधन समस्यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या हेतूने दरवर्षी या संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. भगवान लोखंडे यांनी सांगितले.
या स्पर्धेत पदवी व पदव्युत्तर स्तरावरील सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी महाविद्यालयाच्यावतीने सहभागी होऊ शकतात. एक मीटर बाय एक मीटरच्या पोस्टर वर विद्यार्थ्यांनी आपला संशोधन विषय मांडावा. स्पर्धेत मूल्यमापन पोस्टर व सादरीकरण अशा दोन स्तरांवर केले जाईल, अशी माहिती स्पर्धा प्रमुख डॉ.दिवाकर कदम यांनी दिली.
या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या अधिकाधिक महाविद्यालयांनी सहभागी होऊन ही अभिनव स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.