एसटीच्या 25 गाड्यांचे आरक्षण फुल्ल

श्रीवर्धन, म्हसळ्यातील गणेशभक्तांकडून अतिरिक्त गाड्यांची मागणी

| दिघी | वार्ताहर |

कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवनिमित्त मुंबईतून कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. नोकरी, व्यवसायानिमित्त जिल्ह्याबाहेर वास्तव्यास असलेले चाकरमानी या गणेशोत्सवासाठी आवर्जून गावी येतात. त्यासाठी मुंबईतून श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात जाण्यासाठी जादा गाड्या सोडण्यात येतात. त्याप्रमाणे गणेशोत्सवासाठी आलेल्या मुंबईकरांना परतीच्या प्रवासासाठी जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. यंदाही गावी येणार्‍या सर्वच एसटी गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याचे पाहायला मिळते आहे.

प्रवाशांच्या मागणीनुसार, जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना घरबसल्या आरक्षण करता यावे, यासाठी ऑनलाईन आरक्षण सुविधा उपलब्ध केली आहे. शिवाय, 60 दिवस आधी आरक्षण उपलब्ध केल्याने प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. जिल्ह्यात चार सप्टेंबरपासून मुंबई व उपनगरांतून जादा गाड्यांचे आगमन होणार आहे. मात्र, किती एसटी गावी सोडल्या जातात याची नोंद ही स्थानीक एसटी आगाराकडे उपलब्ध असते. 12 सप्टेंबरला गौरी गणपती विसर्जन आहे. गौरी-गणपती विसर्जन झाल्यानंतर त्या दिवसापासूनच मुंबईकर परतीच्या प्रवासाला लागतात. त्यामुळे 12 सप्टेंबरपासून परतीच्या जादा गाड्यांचे नियोजन श्रीवर्धन एसटी आगारातून केले जात आहे. आरक्षणासाठी msrtc.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळावर व मोबाइल अ‍ॅपवर आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

विविध योजनांमुळे प्रवाशांमध्ये वाढ
अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास आणि सर्व महिलांना 50 टक्के प्रवासी तिकिटात सवलत या दोन योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे एसटीच्या महसूलातही वाढ होत आहे.


गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी साधारपणे 120 एसटी बसेस साधे आरक्षण व ग्रुप बुकिंगद्वारे सोडण्याची तयारी असते. त्यामुळे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

– मेहबूब मानियर, आगारप्रमुख, श्रीवर्धन

Exit mobile version