काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

जिल्ह्यात एकाही ठिकाणी उमेदवारी न दिल्याने नाराज

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सात विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाच्या वाट्याला एकही जागा सोडण्यात आलेली नसल्याने जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासहित पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. रविवार (दि. 27) शेलघर येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित हजारो कार्यकर्त्यांसोबत महेंद्र घरत यांनी संवाद साधला व आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी घरत म्हणाले की, खरे तर लोकसभेच्या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला पोषक होता; परंतु उद्धव ठाकरे सेनेने आपला उमेदवार उभा केला व कोकणातील एकही सीट काँग्रेस पक्षाला मिळाली नाही. पुढील विधानसभेत काँग्रेस पक्षाला न्याय मिळेल असा आशावाद होता; परंतु याही विधानसभेत रायगड जिल्ह्यात एकही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला न सुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. आम्ही कोणत्याही पक्षाचे ओझे उचलणार नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. जोपर्यंत महाराष्ट्र प्रदेशचे नेते आदेश देत नाही, तोपर्यंत आपण कोणत्याही पक्षाचे काम करायचे नाही, असे ते म्हणाले. तसेच बॅरिस्टर ए.आर. अंतुले साहेबांच्या रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला एकही विधानसभा मतदारसंघ न देता भोपळा मिळाला, त्यामुळे महेंद्र घरत यांनी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रदेश चिटणीस तथा रायगड सहप्रभारी श्रीरंग बरगे यांच्यासमोर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. जनतेच्या संवाद सभेसाठी रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उरण मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या मदतीशिवाय कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उरण विधानसभेत काँग्रेस पक्ष किंगमेकर असेल, असेही घरत म्हणाले.

Exit mobile version