| चिरनेर | प्रतिनिधी |
राजकारणात सध्या कुणाचा पायपोस कुणाला नाही, भाजपमध्ये आमदारालाही बोलता येत नाही, त्यांची चिडीचूप अशी अवस्था आहे. मात्र, काँग्रेसमध्ये सन्मान आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची मुभा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो, काँग्रेसमध्ये स्वाभिमानाने आणि सन्मानाने राहा, असे प्रतिपादन काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांनी शेलघर येथे केले.
शनिवारी (दि. 1) शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाज मंदिरात रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. यावेळी निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करताना महेंद्र घरत म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुकांनी अर्ज भरावेत. सर्व अर्जांची छाननी करूनच उमेदवारी जाहीर केली जाईल. त्यांनी पक्षातील शिस्त, निष्ठा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या तीन घटकांवर विशेष भर दिला.
या बैठकीला रायगड जिल्हा प्रभारी राणी अग्रवाल, प्रदीप राव (प्रभारी अलिबाग विधानसभा), डॉमिनिक डिमेलो (प्रभारी उरण विधानसभा), मनोज कांबळे (प्रभारी पेण विधानसभा), अशोक मोरे (प्रभारी श्रीवर्धन विधानसभा), सुरेश काटकर (प्रभारी महाड विधानसभा), सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, ॲड. श्रद्धा ठाकूर, डॉ. मनीष पाटील, महिला जिल्हाध्यक्ष रेखा घरत, नंदराज मुंगाजी, महाराष्ट्र फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अखलाक सिलोत्री, निखिल ढवळे व तालुका अध्यक्ष, तसेच रायगड जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







