आनंद नगरमधील नागरी समस्या सोडवा

शेतकरी कामगार पक्षाची मागणी

| उरण | प्रतिनिधी |

गेल्या काही वर्षापासून उरण येथील आनंद नगरमधील नागरी सुविधा पासून नागरिक वंचित आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई नादुरुस्त गटारे, स्टीट लाईट यासंदर्भात नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर यांना शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शेखर पाटील व माजी नगरसेविका लता शेखर पाटील यांनी निवेदन दिले आहे.

आनंदनगरमध्ये सातत्याने पाणीटंचाई भासत आहे. नागरिकांना गरजे पुरते पाणी मिळत नाही ही अवस्था गेले काही वर्षांपासूनची आहे. सध्या आनंदनगरमध्ये रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्व इमारती रिडेव्हलपमेंटला जात असल्यामुळे येथील लोकसंख्या दुप्पट होणार आहे. त्यामुळे इथे अगोदरच पाणीटंचाई आहे. मग येणारे दुप्पट लोकसंख्येसाठी स्वतंत्र पाण्याची लाईन घ्यावी लागेल. लोकसंख्येच्या मानाने त्या क्षमतेची पाण्याची लाईन आनंदनगरमध्ये बसवावी, जेणेकरून पाण्याची टंचाई दूर होईल व नागरिकांना दिलासा मिळेल. आनंद नगरमध्ये स्ट्रीट लाईटचे दिवे लागत नाही. इथे रात्रीच्या अंधारात चोऱ्या होण्याचे प्रकार होत आहेत. महालक्ष्मी इमारतीमध्ये चोरीचा प्रकार घडलेला आहे. यामुळे स्ट्रीट लाईटचे दिवे बसवण्याची तातडीने व्यवस्था करावी.

रिडेव्हलपमेंटमुळे इमारतींच्या गटारांची व्यवस्था व रुंदीकरण करणे अत्यावश्यक आहे. नवीन गटार लाईन तयार करण्यात यावी. त्याचबरोबर पद पथ नागरिकांना चालण्यासाठी तयार करावे. आनंद नगरच्या गेटवर वाहतूक कोंडी होत असते. यासाठी योग्य प्रकारे नियमन आवश्यक आहे, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे नगराध्यक्ष भावना घाणेकर यांना करण्यात आली. त्याचबरोबर माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, तालुका चिटणीस रवी घरत, नगरसेविका नाहीदा ठाकूर यांना निवेदन देण्यात आले.

Exit mobile version