खारघर ओवे कॅम्पमधील नागरी प्रश्‍न त्वरित सोडवा; रामदास शेवाळे यांचे आवाहन

| पनवेल | प्रतिनिधी |

ओवे कॅम्प खारघर, म्हणजे कोयना विस्थापित नागरिकांना पुनः प्रस्थापित करण्याकरिता वसलेलं गाव. ओवे कॅम्प हे खारघरमधील निसर्गरम्य पांडवकडा डोंगरा लगत असून, बहुतांश मंडळी मराठा समाजाचे असलेले आढळते. मागील पाच वर्षांपासून डोंगराच्या उत्खनन प्रक्रियेमुळे उद्भवणार्‍या ध्वनी प्रदूषण, तसेच गावाला मुख्य रस्त्याला जोडणार्‍या रस्त्याची दुरवस्था, तसेच पाण्याची तीव्र टंचाई, असे अनेक कारणांमुळे येथील सर्व नागरिक बेजार झालेले आहेत.

पाणीटंचाई तर इतकी भीषण आहे की, खारघरसारख्या सुसज्ज ठिकाणी वसलेल्या गावामध्ये एक दिवस आड आणि तेही फक्त एक ते दोन तास प्रत्येक घराला पाणी उपलब्ध होते. ऑगस्ट महिन्यामध्ये पनवेल महानगरपालिकेने एका पत्राद्वारे, सिडको प्रशासनाने मान्यता दिल्याप्रमाणे, 50 एमएम घेरा असलेल्या पुरवठा पाईपलाईनमध्ये वृद्धी करून शंभर एमएम करण्यास मान्यता पत्र दिल्याने, गावामध्ये लवकरच मोठी पाईपलाईन टाकण्याचे लिखित आश्‍वासन दिले होते. मात्र, दोन महिने उलटले तरीही हे काम प्रलंबित असल्याने शिंदे गटाचे, महानगर संघटक मंगेश रानवडे यांनी जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून परिस्थितीचे गांभीर्य समजावून दिले.

संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेबांची शिवसेने गटाचे शिष्टमंडळ व ओवे कॅम्पमधील रहिवासी यांनी मंगळवारी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन ही समस्या लवकरात लवकर सोडवावी याबाबतचे निवेदन सादर केले. शिष्टमंडळामध्ये महानगर संघटक मंगेश रानवडे, खारघर शहर संघटक इम्तियाज शेख, मुनाफ अमरेली व झोयेब शेख, तसेच ओवे कॅम्पमधून निवृत्ती सकपाळ व गणेश होते.

Exit mobile version