| दिघी | वार्ताहर |
मतदार यादीला आधार जोडणी उपक्रमास श्रीवर्धन मतदारसंघात चांगले यश प्राप्त झाले आहे. श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 सप्टेंबर 2022 पर्यंत श्रीवर्धन मतदारसंघातील एक लाख व्यक्तींची मतदार यादीला आधार जोडणी पूर्ण झाली आहे.
मतदारसंघात एकूण दोन लाख 62 हजार मतदार आहेत. त्यापैकी एक लाख मतदारांचे आधार जोडणीचे काम पूर्णत्वास गेले आहे. अमित शेडगे यांनी सांगितले, मतदारसंघातील सर्व विभागाच्या कर्मचार्यांनी अतिशय नेटाने मतदार यादीत आधार जोडणीचे काम यशस्वी पणे पूर्ण करण्यासाठी अतिशय चांगले प्रयत्न केले आहेत. विशेषता मतदार केंद्रस्तरीय अधिकारी शिक्षकांनी अग्रणी भूमिका बजावलेली आहे. सांघिक व नियोजनबद्ध पद्धतीने सर्वांनी काम केल्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघात लवकरच आधार जोडणीचे काम पूर्ण करू असा विश्वास अमित शेडगे यांनी व्यक्त केला आहे.
श्रीवर्धन मतदारसंघाचा श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, रोहा असा विस्तार झालेला आहे. मतदार यादीस आधार जोडणी केल्यामुळे कोणत्याही मतदाराला दोन ठिकाणी मतदान करता येणार नाही. आधार जोडणी उपक्रमास मतदारांकडून प्रशासनास चांगले सहकार्य होत आहे.