पालीतून सोळाशेहून अधिक पोळ्यांचे संकलन; आदिवासी व गरिबांची होळी झाली गोड
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ‘होळी करु लहान, पोळी करु दान’ असे आवाहन महाराष्ट्र अंनिसने केले होते. त्यानुसार पालीतील एक संघर्ष समाज सेवेसाठी ग्रुप व महा. अंनिस शाखेच्या वतीने जवळपास सोळाशेहून अधिक पुरणपोळ्या संकलित करण्यात आल्या. आणि या पुरणपोळ्या आदिवासी वाड्या व आश्रमशाळेत वाटून आदिवासी व गरिबांची होळी गोड करण्यात आली. यंदाही लोकांनी या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.
‘होळी लहान करू या, पोळी दान करू या’ या कार्यक्रमाच्या पाठीमागे सुद्धा राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान टाळणे, पर्यावरणाचे प्रदूषण थांबवणे हा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी हा उपक्रम राबिवला गेला. तो देखील अगदी नियमितपणे, महा. अंनिस पदाधिकारी अमित निंबाळकर व रोशन रुईकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत ठोंबरे या तरुणांनी होळीच्या रात्री सोमवारी (ता.6) पालीतील सर्व होळ्यांवर जावून कागदी खोके वाटले. त्यामध्ये लोकांनी व्यवस्थितरीत्या पोळ्या संकलित ठेवल्या. ठिकठिकाणी लोकांनी उत्स्फुर्तपणे स्वतःहुन पुढे येवून पोळ्या आणून दिल्या. त्यामुळे होळीत जाणार्या शेकडो पोळ्या गरिबांच्या मुखी लागल्या. तालुक्यातील गोमारी व झापवाडी या आदिवासी वाड्या व वावळोली आश्रमशाळा येथे पोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर बच्चेकंपनी व तरुणांसोबत पर्यावरणस्नेही धुलीवंदन साजरे करण्यात आले. यावेळी अंनिस पदाधिकारी अमित निंबाळकर व रोशन रुईकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत ठोंबरे उपस्थित होते.