राष्ट्रीय एकता दौडला प्रतिसाद

| रायगड | वार्ताहर |

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमास युवक, स्वयंसेवी संस्था, शासकीय व पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी यांसह बहुसंख्य नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. येथील वरसोली समुद्रकिनारा येथून सुरु होवून दौडचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आला.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग, तहसील कार्यालय अलिबाग, जिल्हा पोलीस दल, प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, स्वयंसिद्ध संचलित स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या माध्यमातून वरसोली समुद्रकिनारा, अलिबाग येथे राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्य नागरिक दौड मध्ये सहभागी झाले. यावेळी उपस्थितांना उमाकांत कडनोर-तहसीलदार, सर्वसाधारण यांनी प्रतिज्ञा दिली. तसेच, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौडला सुरुवात करण्यात आली आणि समारोप जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाला.

याप्रसंगी उमाकांत कडनोर, विक्रम पाटील, नायब तहसीलदार टोलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर, राखीव पोलीस निरीक्षक बाविस्कर, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, नंदकुमार गोंधळी, धनंजय कवठेकर, डॉ.राजाराम हुलवान यांसह अन्य मान्यवर सहभागी झाले होते .

Exit mobile version