खंडाळेत कुस्ती स्पर्धेला प्रतिसाद

सात आखाड्यांतील मल्लांचा सहभाग

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील महावीर ग्रामस्थ खंडाळे आयोजित खंडाळे येथील मैदानात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नागपंचमीचे औचित्य साधून ही स्पर्धा भरविण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन महावीर ग्रामस्थ खंडाळेचे अध्यक्ष अशोक थळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी दुपारी करण्यात आले. यावेळी पं.स. माजी सदस्य प्रमोद वेळे, अलिबाग तालुका कुस्ती संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र भगत, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष गुरव, रामदास कावजी, मंगेश गोंधळी, अरुण गोंधळी, बाबु वर्तक, ग्रामसेवक शेखर बळी, प्रशासक मंगेश पाटील, नासिकेत कावजी, प्रफुल्ल पाटील, माजी पोलीस उपनिरीक्षक विश्‍वनाथ पाटील आदी मान्यवरांसह खंडाळेतील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कबड्डी हा मातीतील खेळ असून अलिबाग तालुक्याला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जात आहे. पावसाळाचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना गावागावात कुस्ती स्पर्धा भरविल्या जातात. तालुक्यातील खंडाळे ग्रामस्थांनी कुस्ती स्पर्धेची गेली 70 वर्षाची परंपरा जपली आहे. नागपंचमीच्या दिवशी गावात दरवर्षी कुस्ती स्पर्धा भरवून कुस्ती मल्लांना या खेळातून व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला जातो. यंदादेखील नागपंचमीच्या दिवशी सोमवार (21 ऑगस्ट) रोजी खंडाळेमध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते.कुस्ती स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील आंदोशी, मांडवा, वाडगाव, आवास, पनवेल तालुक्यातील पिसावे, सापाडा, रोहामधील यशवंतखार या गावांमधील एकूण सात आखाड्यांतील सुमारे दीडशेहून अधिक मल्लांनी सहभाग घेतला. वजनी गटात सुरु असलेल्या कुस्तीचा थरार पाहण्यासाठी खंडाळे परिसरासह आजूबाजूच्या गावांतील कुस्ती प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. कुस्तीत सहभाग घेणार्‍या मल्लाला पदक तसेच प्रत्येक कुस्तीमध्ये विजेता ठरणार्‍या मल्लाला रोख रक्कम, चषक व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या आखाड्याला चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Exit mobile version