वेतन निश्चिती कार्यवाहीसह अन्य मागण्या
दप्तर दिरंगाईविरोधात निषेधाचा इशारा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
इतर जिल्ह्यांत वेतन निश्चितीची कार्यवाही पूर्ण होत असताना रायगड पोलीस दलातील प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप करत सेवानिवृत्त पोलिसांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला आहे. पोलीस महासंचालकांच्या स्पष्ट आदेशानंतरही जिल्ह्यात कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने नाराजी तीव्र झाली आहे. दप्तर दिरंगाईविरोधात निषेध नोंदवण्यासाठी येत्या 10 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती निवृत्त पोलीस कल्याणकारी संस्था रायगडने दिली आहे.
संस्थेच्या निवेदनानुसार, रायगड जिल्ह्यात सुमारे 650 सेवानिवृत्त पोलीस अंमलदार आहेत. पोलीस हवालदार पदोन्नतीवेळी एक वेतनवाढ देऊन वेतन निश्चिती करावी, तसेच पडताळणी पथकाकडून ती प्रमाणित करून घ्यावी, असे स्पष्ट आदेश 17 मार्च 2022 रोजी गृह विभागाने दिले होते. यानंतर 28 मार्च 2022 रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्व घटक प्रमुखांना शासन आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. तरीदेखील रायगड पोलीस दलाकडून आजतागायत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
1 जानेवारी 2006 पूर्वी आणि त्यानंतर पदोन्नती मिळालेल्या अनेक पोलीस अंमलदारांचा या प्रक्रियेत समावेश होणे अपेक्षित होते. वेतनवाढीस पात्र असलेल्या सेवानिवृत्त अंमलदारांनी जून 2005 पासून अर्ज सादर करण्यास सुरुवात केली होती. डिसेंबर 2025 पर्यंत एकूण 88 अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा झाले आहेत. अर्ज सादर केल्यानंतरही वारंवार पाठपुरावा करूनही कार्यालयाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. 24 नोव्हेंबर 2025 रोजी संस्थेच्या 25 सदस्यांनी जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षकांची भेट घेऊन समस्या मांडली होती. त्यावेळी वेतन निश्चितीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून सेवापट पडताळणीसाठी पाठवण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही प्रगती न झाल्याने पुन्हा भेट घेण्यात आली. त्यावेळी कार्यालयातील लिपीकांनी आठवड्याला पाच ते दहा सेवापटांची वेतन निश्चिती करण्याचे आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही दिसून आलेली नाही.
दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये वेतन निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. मात्र रायगडमध्येच ही प्रक्रिया रखडल्याने सेवानिवृत्त पोलिसांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. लाखो रुपयांच्या आर्थिक लाभापासून वंचित राहिलेल्या या पोलिसांनी आता रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. 10 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून दीडशेहून अधिक सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कासार यांनी दिली.
अर्जाला केराची टोपली
रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आयुष्य झिजवणाऱ्या पोलिसांनाच सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्कासाठी दारोदार भटकंती करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. वेतनवाढीस पात्र असलेल्या 88 सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांनी डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत. मात्र, त्यांच्या अर्जांची साधी दखलही घेतली गेली नसल्याचा आरोप निवृत्त पोलीस कल्याणकारी संस्थेकडून करण्यात आला आहे. महिनोनमहिने पाठपुरावा करूनही एकाही अर्जाची पूर्तता करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या पोलिसांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र असून, त्यांच्या अर्जांना अक्षरशः केराची टोपली दाखवण्यात आल्याची तीव्र भावना सेवानिवृत्त पोलिसांकडून व्यक्त होत आहे.







