सेवानिवृत्त शिक्षकांची अनियमित पेन्शनमुळे हेळसांड

| रोहा । प्रतिनिधी ।

रोहा तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची अनियमित मिळणार्‍या पेन्शनमुळे हेळसांड होत आहे. शासनाच्या अन्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मात्र 30 तारखेला शासन पेन्शन अदा करत आहे. यामुळे नियमितपणे पेन्शन अदा न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना अनिश्‍चित व अनियमित तारखांना पेन्शन मिळत आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही हा दुजाभाव केला जात आहे. आपली हक्काची पेन्शन वेळेत न मिळाल्यामुळे वयोवृद्ध व आजारी सेवानिवृत्त शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाच्या अन्य सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या प्रमाणे आमची ही पेन्शन नियमित अदा करा, अन्यथा सेवानिवृत्त शिक्षकांना शासनाचे विरोधात उपोषणाला बसावे लागेल असा इशारा जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सेवाभावी संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम खांडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

या आधी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची पेन्शन महिन्याच्या 1 ते 2 तारखेपर्यंत त्यांच्या हातात मिळत होती. मात्र मागील दोन वर्षे राज्यातील अस्थिर व बेभरवशाच्या राजकीय परिस्थितीचा परिणाम प्राथमिक शिक्षकांच्यावर होत आहे. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांमध्ये अनेक वयोवृद्ध झाले असून काही गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. काहींची उपजीविका व औषधोपचार हे सर्व महिन्याकाठी मिळणार्‍या पेन्शनवर अवलंबून आहे, पण ती वेळेत मिळत नसल्याने त्यांना दुसर्‍यांकडे हात पसरावे लागत आहेत. दुसरीकडे शासनाच्या अन्य खात्यांचे मधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना मात्र महिन्याच्या 30 तारखेलाच पेंशन अदा केली जात आहे.

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना पंचायत समिती, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांचेकडे पेंशन बाबत वारंवार विचारणा करावी लागते. प्रत्येक वेळी जिल्हा परिषदेकडून शासना कडून अनुदान आले नसल्यामुळे पेंशन देण्यास वेळ लागत असल्याचे कारण सांगितले जात आहे. आपल्यावर होत असलेला हा अन्याय व वेळेत पेंशन न मिळाल्यामुळे होणारी हेळसांड आता थांबवण्याचा निर्धार जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी केला आहे.

Exit mobile version