आंबा, कांदा पीक लांबणीवर जाणार
| अलिबाग | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे काढणीला आलेले भातपीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतांमध्ये आडव्या झालेल्या पिकावर पाणी साचल्याने भातपिकाला मोड येऊन ते कुजण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे उभे असणारे पीक शेतात पाणी असल्याने कापणी करता येत नाही. परिणामी, भातपीक धोक्यात आले आहे. त्याचबरोबर आंबा पिकाला देखील तुडतुड्याचा धोका निर्माण झाला आहे. पांढरा कांद्याचा हंगामही लांबणीवर गेला आहे. एकंदरीत, परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे कंबडरे मोडले असून, तो आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्ह्यामध्ये 84 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भातपिकांची लागवड करण्यात आली आहे. कोलम, सुवर्णा, रत्ना अशा अनेक पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. भातपीक बहरले आहे. भातपीक कापणी योग्य झाल्याने मागील पंधरा दिवसांपासून कापणीला सुरुवात करण्यात आली. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. रात्री विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक भागातील भातपीक आडवे झाले आहेत. पावसाचे पाणी सखल भागात साचले आहे. त्यामुळे भातपीक अडचणीत येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तयार झालेल्या पिकाची कापणी पावसामुळे करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. पावसामुळे भात कापणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवाळीपर्यंत 50 टक्क्यांपर्यंत भातकापणीची कामे पूर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, पावसामुळे ही कामे पुढे जाण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी कापणी करून भाताची रोपे सुकविण्यासाठी शेतात ठेवल्याने तीदेखील पाण्यास भिजून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. भातपिकांवर तुडतुड्या व इतर किडरोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
आंबापिकाला धोका
जिल्ह्यात आंब्याचे क्षेत्र 17 हजार हेक्टर आहे. अवकाळी पावसासह कधी ढगाळ तर कधी कडक उन्ह या बदलत्या वातावरणामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. आंब्यावर तुडतुडयासह इतर किडरोगांचा धोका निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कांद्याचा हंगाम लांबणीवर
जिल्ह्यात विशेष करून अलिबाग तालुक्यात पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र 300 हेक्टर आहे. कार्ले परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. पांढऱ्या कांद्याची रोपे लागवडीसाठी तयार झाली आहे. परंतु, शेतांमध्ये पाणी साचल्याने लागवड करणार कशी, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पाऊस असाच सुुरू राहिल्यास कांद्याला बुरशीचा धोका जाणवेल. 14 नोव्हेंबरपर्यंत होणारी कांद्याची लागवड एक महिना उशिरा होण्याची शक्यता आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
भातपीक चांगल्या पद्धतीने बहरले आहे. परंतु, बदलत्या वातावरणाचा पिकावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. पावसामुळे भातपिकाची दैना उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भातपिकावर तुडतुड्या व अन्य किडरोगाचा प्रादुर्भाव आहे. हातातोंडाशी आलेला घास या रोगांमुळे जाण्याची भीती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह आंबा उत्पादक शेतकऱ्यांनादेखील त्याचा फटका बसणार आहे.
सतीश म्हात्रे,
शेतकरी
जागतिक हवामान बदलामुळे (ग्लोबल वॉर्मिंग) वातावरणात आमूलाग्र बदल होत आहे. अनेक किडरोगांचा प्रादुर्भाव आंब्यावर होत आहे. परतीचा पाऊस लांबल्याने मोहर प्रक्रियेला खीळ बसली आहे. ही प्रक्रिया उशिरा होणार आहे. बऱ्याचशा आंब्याच्या बागांना छोटी पालवी दिसत आहे. मोहर उशिरा येईल. आंब्याचे उत्पादन मार्चच्या पुढे जाईल. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
चंद्रकांत मोकल,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ
