| अलिबाग | प्रतिनिधी |
मासेमारीच्या नावाखाली बोटीतून डिझेलची तस्करी करणाऱ्या गणेश कोळीसह तिघांविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणेश कोळी याला अटक केली असून, त्याला शनिवारी दुपारी अलिबागमधील न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अलिबाग तालुक्यातील रेवस येथील पकटी जवळ खाडीमध्ये मासेमारी करणाऱ्या श्री समर्थ कृपा (निसर्ग दर्शन) या बोटीतून डिझेलची तस्करी होत असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा असल्याची माहिती मांडवा सागरी पोलीसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. बोटीतील इंजिनच्या खोलीच्या मागील तीन खणांमध्ये तसेच मोकळ्या जागेत पाणी मिश्रीत 5 हजार लिटर असे चार लाख रुपये किंमतीचा डिझेलचा साठा, 15 हजार रुपये किंमतीचा होन्डा कंपनीचा जनरेटर, द्रव पदार्थ उपसा करणारी 15 हजार रुपयांची मोटर, 10 लाख रुपयांची मासेमारीची बोट तसेच मोरेश्वर नाखवा यांच्या नावे असलेले विविध कागदपत्रे या बोटीत सापडले. एकूण 14 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, गणेश कोळी, विनायक कोळी, मोरेश्वर नाखवा या तिघांविरोधात शुक्रवारी रात्री मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील गणेश कोळी याला अटक केली असून, फरार दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांच्या या कारवाईने अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्यांना दणका मिळाला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई करीत आहेत. बोटीवर अवैधरित्या विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या फायद्यासाठी डिझेलचासाठा करून ठेवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.







