महिलेसह एकावर गुन्हा दाखल
| गुहागर | प्रतिनिधी |
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पैशांसाठी एका पाच वर्षाच्या मुलाला विकल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेने रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी दापोली पोलिसांनी एका महिलेसह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुहागर येथील एस.टी. स्टँडसमोर हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. दापोली तालुक्यातील हर्णे परिसरातून या सगळ्या धक्कादायक प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. या सगळ्या प्रकारची तक्रार हर्णे पोलीस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल पंकज फुलचंद पवार यांनी दाखल केली आहे. आर्थिक फायद्यासाठी आपल्याच 5 वर्षांच्या मुलाला विकल्याप्रकरणी एका मातेसह एका व्यक्तीविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी महिलेने तिच्याच 5 वर्षाच्या मुलाला आर्थिक फायद्यासाठी बोऱ्या कारुळ-गुहागर येथील आरोपी सत्यवान दत्ताराम पालशेतकर (52) याला विकले. सत्यवान पालशेतकर याने त्या बालकाची खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. या सगळ्या धक्कादायक प्रकारात संशयित आरोपी अरबिना सुफियान पांजरी (24) या महिलेने दुसरा संशयित आरोपी सत्यवान दत्ताराम पालशेतकर याला मुलाला विकल्याचे या घटनेत समोर आले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत दापोली पोलिसांनी या दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, दापोली तालुका पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनानुसार दापोलीच्या सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक शुभांगी हिरेमठ या सगळ्याचा अधिक तपास करत आहेत.
या सगळ्या धक्कादायक प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी विकण्यात आलेल्या बालकाला सुखरूपरित्या ताब्यात घेऊन सुरक्षित आश्रमात ठेवण्यात आले आहे.