रेवदंडा- साळाव पूल दुरुस्तीने मुरुडकरांचे बेहाल

राष्ट्रवादीतर्फे आगारप्रमुखांना निवेदन

| कोर्लई |वार्ताहर

साळाव पूलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे मागील महिन्यांपासून मुरुडमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून त्यातच आगारातील गाड्यांची संख्या कमी करण्यात आल्याने मुरुडकरांची अक्षरश ससेहोलपट होत आहे. प्रवासी सेवा पुर्ववत करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुरुड आगाराला करण्यात आलेली आहे. यासाठी तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी शिष्टमंडळासह आगारप्रमुख नीता जगताप यांना एक निवेदन सादर केले.

या शिष्टमंडळात हसमुख जैन, मुजफ्फर सुर्वे, योगेंद्र गोयजी, आदेश भोईर, विजय भोय, कबुद्दीन हलडे, सदानंद तरे, किरण नाईक, सौनिक दामाद, दिपक शिरवणकर, रिझवान बोदले, इरफान खतीब, ईब्रान खतीब, युसुफ फहीम, हाजिद दरोगे, संजय पोतदार, मकसुद कबले, आपत्ती व्यवस्थापन नागरी संरक्षण दल तालुका प्रमुख तुफैल दामाद यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश होता.
आगारप्रमुखांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, सद्यस्थितीत साळाव पुलाच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने अनेक एसटी बसेस इतर मार्गावरुन सोडण्यात येत आहेत, तर काही एसटी बसेस बंद करून गाड्यांची संख्या कमी केली आहे. सर्वसामान्यांचा मोठा प्रवासीवर्ग हा एसटीने प्रवास करतो व सद्यस्थितीत या सर्वसामान्य प्रवासी वर्गाची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. शिवाय नादुरुस्त व दुरावस्था झालेल्या गाड्या मुरुड डेपोमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात चालत आहेत, ज्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे.
अशा परिस्थितीत आपल्याकडून योग्य उपाययोजना होणे क्रमप्राप्त आहे. परंतु तसे होताना काही दिसत नाही. शिवाय एसटी विभाग मुरुड डेपो बंद करण्याच्या मार्गावर आहे, असे असेल तर मोठा जनक्षोभ होऊ शकतो,असा इशाराही देण्यात आला आहे. अनेकांनी एस.टी. बस सेवा मुरुडमध्ये चालु व्हावी याकरीता अगदी तुटपुंज्या दरात जमिनी दिल्या, त्यांच्यावर तर अन्याय होईलच परंतु एवढी मोठी सेवा मुरुडकरांच्या हातून ओरबडणार असाल तर आम्ही मुरुडकर ही बाब सहन करणार नाही. यामुळे उद्भवणार्‍या परिस्थितीला आपणास सामोरे जावे लागेल याचा पुर्ण विचार व्हावा व प्रवासी सेवा लवकरात लवकर पुर्ववत करण्यात यावी. असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मोरीचे काम सुरु करा

मुरुड- आगरदांडा रस्त्यावरील लक्ष्मीखार नजिक असलेल्या मोरीचे काम खा. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून मंजूर असूनही पावसाळा ऐन तोंडावर आला असता ही अद्याप चालू न झाल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून मोरीचे काम तातडीने सुरू करण्यात न आल्यास याविरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. जी. गोरे यांना आपल्या सहकार्‍यांसमवेत एक निवेदन देण्यात आले आहे.

Exit mobile version