महसूल कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

। तळा । वार्ताहर ।
रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी घोषणा देऊन तहसील कार्यालय तळा येथे निदर्शने करण्यात आली.

शासन स्तरावर मागील दोन वर्षे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने महसूल संघटना बेमुदत संपावर जाणार आहे. राज्यातील महसूल विभाग, महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून महसूल सहाय्यक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. शासन निर्णय महसूल व वनविभाग दि.10 मे 2021 अन्वये नायब तहसिलदारसंवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.व त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांची सेवा जेष्ठता याद्या राज्य स्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढलेले आहे. परंतु अव्वल करून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने सदर पत्र तात्काळ रद्द करावे तसेच इतर मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्‍वासन मिळत असून त्यांची पूर्तता होत नसल्याने आंदोलन करणार असल्याचे महसूल कर्मचार्‍यांनी सांगितले. तसेच 4 एप्रिलपासून बेमुदत संप करणार असल्याचेही सांगितले.

याप्रसंगी रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना सरचिटणीस भुषण पाटील तळा तालुका अध्यक्ष सचिन महामुणकर, सेक्रेटरी सचिन चाळके, श्याम राठोड, संदीप आखाडे, संजय टेबे, जयेश कदम, श्रीपत शिर्के, आरती पुरी, मोरेश्‍वर फुलारे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version