कृषीवलच्या दणक्याने ‌‘महसूल’ला जाग

अनधिकृत भरावाचा पंचनामा, नदीतील भरावाचं काय?

| पेण | प्रतिनिधी |

31 मे रोजी दैनिक कृषीवलमध्ये ‌‘भोगावती नदीमध्ये अनधिकृत बांधकाम’ या मथळ्याखाली भोगावती नदीमध्ये केलेल्या अतिक्रमणाची बातमी लावल्यानंतर महसूल खाते खडबडून जागे झाले. मात्र, जलसिंचन खाते निद्रावस्थेतच आहे. महसूलकडून मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्या पंचनाम्यानुसार, 80 मीटर लांब, 15 मीटर रूंद आणि एक मीटर उंच भरावासाठी 40 ब्रास डबरचा वापर केल्याचे म्हटले आहे. परंतु, यामध्ये हे बांधकाम नदीत केले आहे की नाही, याबद्दल काहीही उल्लेख केलेला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रसार माध्यमाची तक्रार ही नदीत बांधलेल्या बांधकामासंदर्भात होती. परंतु, महसूल खात्याकडून नदीतील अनधिकृत बांधकामाबद्दल एकही अक्षर लिहिले गेले नाही.

अनधिकृत उत्खनन म्हणून डबर दाखविले आहे, मातीचा उल्लेख नाही. तसेच या अनधिकृत उत्खननाबाबत 1,85,310 रू. दंडात्मक कारवाई केलेली आहे. ही कारवाई संजय अनंत म्हात्रे यांच्या नावाने असून, हे अनधिकृत बांधकाम दांडेकर नामक व्यक्तीने केलेले आहे. जमीन मालकाला याबाबत कोणतीही पुसटशी कल्पना नाही. पंचनामा करून 9 दिवस उलटून गेलेले आहेत. परंतु, जमीन मालकाकडून केलेल्या कारवाईसंदर्भात कोणतेच लेखी उत्तर आलेले नाही. सात दिवसांच्या आत लेखी उत्तर महसूल खात्याने मागितले होते. परंतु, उत्तर दिले नाही. याचाच अर्थ, अनधिकृत उत्खनन व बांधकाम झालेले आहे, हे निश्चित. परंतु, हे बांधकाम नदीत झालेले असताना पंचनाम्यामध्ये उल्लेख नाही.

याबाबत तहसीलदार तानाजी शेजाळ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही जलसिंचन विभागाला पत्रव्यवहार करीत आहोत. नदीमध्ये बांधकाम झाले आहे की नाही, याबाबत त्यांनी पाहायचे आहे. गेली कित्येक वर्षे भोगावती नदीबाबत हेच होत आलेले आहे. कारवाई महसूल खात्याने करायची की जलसिंचन खात्याने, हा वाद संपतच नाही. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गापासून भोगावतीच्या उगम स्थानापर्यंत मोठ्या प्रमाणात नदीपात्रात अतिक्रमण झालेले आहे. भविष्यात याचा फटका नदीकिनारी राहणाऱ्या गावांबरोबर पेण शहरालादेखील झाल्याशिवाय राहणार नाही.

Exit mobile version