आंबेत पुलाच्या बंद अवस्थेमुळे प्रवाशांची दिशा गुल
संरचना कंपनीची चौकशी होण्याची स्थानिकांची मागणी
। आंबेत । वार्ताहर ।
आंबेत सावित्री पूल हा दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सुरु होऊन पुन्हा एकदा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने हा पूल कोसळण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. याच अनुषंगाने दिनांक 12 फेब्रुवारी रोजी हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सुमारे 11 कोटी या पुलावर खर्च करण्यात आले. दुर्दैवी बाब अशी कि आज पुन्हा एकदा याच मार्गावरून प्रवाश्यांना जवळजवळ 70 ते 80 किमीचा उलट दिशेने मुंबई गोवा महामार्ग, महाड दासगाव, दादली चिंभावे, म्हाप्रळ या मार्गाने मंडणगड, दापोली, खेड, उतंबर, हर्णे, केळशीकडे जाण्यासाठी प्रवास करावा लागत आहे. सबंधित अधिकारी वर्गाच्या नाकर्तेपणामुळे हि परिस्थिती ओढवली आहे. यासंदर्भात काम करीत असलेल्या संरचना कंपनीची देखील सखोल चौकशी करण्यात यावी असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
गेल्त्याया दोन वर्षापासून पुलाच्या कामात निव्वळ मलम पट्टीच लावण्याचे काम करण्यात आले आहे. म्हणूनच आज हि परीस्थिती आंबेत सावित्री पुलासंदर्भात निर्माण झाली आहे आणि यामुळेच प्रवाशी वर्गाचा चिंतेचा प्रश्न बनला आहे. रायगड लोकसभा मतदार संघाचे खा.सुनील तटकरे यांनी सबंधित पुलासंदर्भात तातडीने मंत्री मंडळात योग्य निर्णय घेऊन प्रवाशांच्या पर्यायी वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. परंतु अद्याप कोणतीही यंत्रणा आंबेत बंदर परिसरात दाखल झालेली नसून स्थानिक नागरिकांना दळणवळण बाजारपेठ, दवाखाने मेडिकल इत्यादी अत्यावश्यक सेवेकरिता मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आंबेत सावित्री पुलाच्या बंद अवस्थेमुळे आमच्या सारख्या स्थानिक नागरिकांना देखील 2 किमीच्या अंतरासाठी 60 ते 70 किमीचा उलट प्रवास करावा लागत आहे.अद्याप कोणतीही पर्यायी यंत्रणा या परिसरात दाखल झालेली नसून प्रशासनाने याकडे गंभीरतेने बघितले पाहिजे. – जितेंद्र सावंत जि.प.सदस्य