विनामूल्य मिळणार सर्व प्रवाशांना प्रवास
। आंबेत । वार्ताहर ।
गेली महिनाभर बंद असलेला आंबेत सावित्री पूल सर्व प्रवासी वाहतुकीसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी डोकेदुखी ठरत होती, मात्र परिसरात निर्माण झालेला जागेचा वाद हा या पर्यायी वाहतुकीसाठी मुख्य कारण बनले होते हीच बाब लक्षात घेत महसूल विभाग, भूमी अभिलेख, पोलीस प्रशासनाच्या अधिकारी वर्गाने शनिवारी (दि.12) आंबेत येथील जागा मालकांना भेट दिली. यावेळी तब्बल चार तास या जागेसाठी प्रशासनाकडून जागा मालकांची समजूत काढण्यात आली
पुलाची तांत्रिक अडचण लक्षात घेता प्रशासनाकडून पुन्हा रो-रो सेवेचा पर्याय या ठिकाणी ठेवला जेणेकरून पुलाच्या कामात कोणतीच बाधा निर्माण होणार नाही. एकूण 300 मीटर लांब असलेल्या सावित्री खाडीवरील हा प्रवास अवघ्या काही मिनिटांचा असणार असून उलट दिशेने प्रवास करणार्या प्रवासी, पर्यटकांना रो-रो सेवेतून प्रवास करण्यासाठी प्रशासनाकडून यावेळी आव्हान देखील करण्यात आले. यावेळी तहसीलदार समीर घारे, महसूल सर्कल अधिकारी सलीम शहा, बांधकाम विभागाचे गंगाने, उलागडे, पीआय श्रीकृष्ण नावले, भूमी अभिलेख पाटील, धुमाळ यासह अन्य अधिकारी पोलीस वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.