चंद्रकांत मोकल यांचे मंत्री संदीपान भुमरे यांना निवेदन
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
कोकणातील आंबा उत्पादकांना बदलते हवामान व अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. आंबा बागायतदार पूर्णपणे कोलमडून गेला आहे. त्यामुळे शासनाकडून जलद व योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन फलोत्पादन व रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांना देण्यात आले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, बदलत्या हवामानामुळे यावर्षी दि.1 व 2 डिसेंबर 2021 रोजी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे आंब्याला खास करून कोकणातील हापूस आंब्याला पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर कुजून गेला व मावा तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात आंब्यावर प्रादुर्भाव झाला. मात्रा आंबा उत्पादकांनी महागडी कीटकनाशके, पेस्टीसाईडस् व बुरशी नाशके यांचा वापर करून प्रचंड मेहनत केली. त्याला यश येऊन 60 टक्के बागा पुन्हा मोहोरल्या पण मोहरात नर फुलांचे प्रमाण अधिक असल्यामुळे फळधारणा झाली नाही. त्यामुळे या वर्षीचा हंगाम गतवर्षीपेक्षा वाईट झाला आहे. जेमतेम 10 ते 15 टक्के उत्पन्न मिळणार आहे. मोहरे टिकविण्यासाठी पुन्हा मोठ्या प्रमाणात औषधांचा खर्च वाढला आहे. तर वाईट हवामानामुळे वाटाण्याएवढे आंबे देखील धरले जात नाहीत असे मोकल यांनी निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे या कोकणातील वस्तुस्थितीचा सरकारने गांभीर्याने विचार करून कोकणातील आंबा उत्पादकांना सावरण्यासाठी भरीव आर्थिक मदत करावी व यासाठी आवश्यक पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी वजा विनंती चंद्रकांत मोकल यांनी केली आहे.