माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचे गौरवोद्गार
कनकेश्वर फाटा सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा
। अलिबाग/सोगांव । विशेष प्रतिनिधी ।
मी अलिबागकर असल्याचा मला अभिमान आहे, कारण इथे जी सुख-शांती, समाधान आहे, ती इतर कुठेच नाही, हे मी ठामपणे सांगतो, असे गौरवोद्गार रवी शास्त्री यांनी अलिबाग-रेवस मार्गावरील कनकेश्वर फाटा येथील चौकाच्या सुशोभीकरणाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी काढले.
भारतीय क्रिकेट स्पर्धेत खेळत असतांना साधारण 30 वर्षांपूर्वी म्हणजे 90/92 साली मी अलिबागला आवास-सासवणे येथे राहायला आलो, तेव्हा येथील आनंदी वातावरण मला खूपच आवडले, कारण इथे जी सुख-शांती, समाधान आहे, ती इतर कुठेच नाही, म्हणून मी ह्या ठिकाणी मी स्थायिक झालो. मी जेव्हा खेळामध्ये जिंकतो तेव्हा उंच शिखरावर पोहचतो आणि हारतो तेव्हा तळाशी जातो, यावेळी मनाच्या व शरीराच्या शांतीसाठी मी निसर्गरम्य अशा माझ्या अलिबागला येतो आणि काही विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या खेळासाठी तितक्याच जोमाने जातो. त्यामुळेच मला गर्व आहे मी अलिबागकर असल्याचा, असे गौरवोद्गार माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी काढले.
समीरा ग्रुपच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून अलिबाग-रेवस मार्गावरील प्रसिद्ध अशा कनकेश्वर मंदिराकडे जाणार्या मार्गावरील कनकेश्वर फाटा या मुख्य चौकाचे आंतराष्ट्रीय क्रिकेट चषकाची नेत्रदीपक अशी प्रतिकृती साकारत सुशोभीकरण करण्यात आले होते. या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलतांना सांगितले की, समीरा ग्रुपने कनकेश्वर फाटा येथील चौकाचा सुशोभीकरण करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट चषकाची खूपच सुंदर अशी प्रतिकृती साकारली आहे आणि लोकार्पण सोहळा माजी क्रिकेटपटू व माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, मीनाक्षी पाटील यांच्याहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे, याचा मान आपण अलिबागकरांनी मला दिला, हे मी माझे भाग्य समजतो, तसेच मुंबई-सिंधुदुर्ग कोस्टल रोड, करंजा-रेवस पूल आदी विकासकामे लवकरच मार्गस्थ होतील, असे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये मा.आ.पंडित पाटील, जि.प.माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, जि.प.सदस्य चित्रा पाटील, जि.प.समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, नंदू मयेकर, शंकरराव म्हात्रे, अलिबाग सभापतीप्रमोद ठाकूर, संस्थापक व मॅनेजिंग डायरेक्टर समीरा ग्रुपचे समीर नेरूरकर व सर्व सभासद रा.जि.पो.अधिक्षक अशोक दुधे, रा.जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.