पावसाच्या आगमनाने राबाला नवसंजीवनी; शेतकर्‍यांना दिलासा

। पाताळगंगा । वार्ताहर ।
मृग नक्षत्र सुरु झाल्यानंतर दोन दिवसांनी पावसाने आपली हजेरी लावल्याने बळीराजाने शेतात पेरणी केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. पेरणी केल्यानंतर राब तयार होत असताना पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील राब करपून जाण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तविली जात होती. अखेर दुपारी पावासाचे आगमन झाल्यामुळे राबाला नवसंजीवनी मिळाल्यांने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
वरुणराजाची कृपादृष्टी राहिल्यास शेतातील पेरलेले राब लवकर तयार होवून भात लागवड ही लवकर होइल. मात्र त्यासाठी पावसाचे सातत्य असणे गरजेचे आहे. दिवसभरातून उन्हाचा दाह वाढत चालला असून अधुन-मधून ढगाळ वातावरण शेतकर्‍यास लवकर पाऊस येण्याचे संकेत देत आहे. याचीच प्रचीती म्हणून दुपारी अचानक पावसाचे आगमन झाले. यामुळे शेतात पाणी जमा होवून राबाला नवसंजीवनी मिळाली असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.

पावसाच्या आगमनाने पेरणी केली. मात्र राब थोडे फार वरती आल्यावर पावसाने मौन धारण केले. पावसाचे पाणी नसल्यामुळे राब सुकून जात असताना पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत.

देविदास मालकर, शेतकरी, तळवली
Exit mobile version