| रोहा | प्रतिनिधी |
बिघडत चाललेल्या निसर्गचक्राचा सर्वाधिक मोठा फटका शेती क्षेत्राला आणि बळीराजाला बसला आहे. यावर्षी रोहा तालुक्यात रब्बी हंगामात मोसमी पावसाने मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अवेळी हजेरी लावल्याने शेती क्षेत्राचे कधीही भरून न येणारे फार मोठे नुकसान झाले आहे. आणि आता हातातोंडाशी आलेले पीक वाढत चाललेल्या पावसाने निसटून जाण्याची भीती शेतकरी वर्गा समोर उभी ठाकली आहे.
मे च्या पहिल्या आठवड्यात पावसाने केलेली सुरूवात आता थांबायचे नावच घेत नाही. संपूर्ण मे महिन्यात पाऊस अधून- मधून बरसतच राहिल्याने भातशेतीमध्ये ढोपरभर पाणी तुंबले होते. उभी भातशेती आडवी झाल्याने व शेती कापण्या लायकच राहिली नसल्याने शेतकरी अक्षरक्ष: देशोधडीला लागला. अशा कठिण काळात शेतकरी वर्गाने स्वतःला सावरून घेतले. खरीप हंगामाचे भातशेतीच्या कामासाठी सज्ज झाला. सुरूवातीला बियाणे लागवडीयोग पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी झाला व भाताची तयार रोपेही योग्य वेळेतच लागवडीखाली आणली. लागवडीची कामे शंभर टक्के यशस्वीरित्या पार पाडली नाही तोच पुन्हा पावसाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने पुन्हा जोरदारपणे बरसायला सुरूवात केल्याने जुलै महिन्यात दोन तीन वेळा पुर परिस्थिती निर्माण झाल्याने भातशेती अक्षरशः आठ आठ दिवस पाण्याखाली तुंबून राहिली होती. तिच परिस्थिती ऑगस्ट महिन्यात आणि आता चालू सप्टेंबर महिन्यात भातशेतीने फुल धरुन पिकायला सुरूवात केली असल्याने व हलवी भाताची कणसे तयार होण्याच्या मार्गावर असताना पुन्हा सक्रिय झालेला पाऊस शेती क्षेत्राचे फारच मोठे नुकसान करू लागला आहे. त्यात आणखी भर म्हणजे भात पिकांवरती ठिकठिकाणी पडत असलेल्या करपा रोगानेही शेतकरी हवालदिल झाला आहे. अगोदरच शेती परवडत नसताना व महागाईने उच्चांक गाठला असतानाच काढओढ करून शेती पिकविली जात आहे. परंतु, चालू हंगामात सततच्या ऊन – पावसाच्या खेळामुळे शेती व शेतकरी वर्गाचे पुरते नुकसान झाले आहे.
लागवडीचे क्षेत्रात घट
रोहा तालुक्यातील शेतकरी वर्ग पुरता बेजार झाला असल्याने शेती लागवडीचे क्षेत्रही दहा हजारावरून सात हजार तीनशे एवढ्यावर आल्याने उत्पादन क्षेत्रही घटू लागले आहे.
शेती क्षेत्रावर वारवार येत असलेल्या संकटांमुळे उत्पादनाचे क्षेत्र कमी झाले आहे.या वर्षाच्या पावसाळी हंगामात पावसाने मोठाच उच्चांक गाठल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाच्या होणाऱ्या नुकसानीबाबत दोन तीन वेळा पंचनामेही करण्यात आले आहेत. शेतीकडे तरूण वर्गाने अधिक लक्ष द्यावे यासाठी शासन स्तरावरूनही चांगल्या पद्धतीने प्रबोधनाचे काम सुरू आहे.
महादेव करे,
तालुका कृषी अधिकारी, रोहा







