उरण तालुक्यात भातपिके संकटात

जमिनीला भेगा पडल्याने शेतकरी चिंतेत; वर्षभर धान्याची गरज भागविणे झाले कठीण

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यात पावसाची दीर्घ उघडीप लांबविल्याने खरीप हंगामातील भातशेती संकटाच्या छायेत सापडली आहे. त्यामुळे तालुक्यातील भातशेती करणारा शेतकरी चिंतेत सापडला आहे. तालुक्यातील भातशेती जरी हिरवीगार दिसत असली तरी प्रत्यक्ष परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. खरीप हंगामातील भातशेतीसह पुढची रब्बी हंगामातील कडधान्य पिके जमिनीच्या ओलाव्या अभावी शेतकऱ्यांना घेता येणार नाहीत.

दरम्यान, पाणथळीच्या जागा वगळता बहुतांशी शेती कोरडी पडून, भातशेती जमिनीला भेगा गेल्या आहेत. यामुळे बहरलेली भातपिके संकटात आली आहेत. पावसाने रायगड जिल्ह्यासह उरण तालुक्यात पाठ फिरविल्याने शेती कोरडी पडली आहे. दरम्यान भातशेती लागवड करणारा येथील शेतकरी हातात तोंडाशी आलेले भात पीक वाचवण्यासाठी धडपडत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी, तलाव व पाण्याच्या पंपाची व्यवस्था आहे. असे तालुक्यातील शेतकरी भातशेतीला कृत्रिम पाणीपुरवठा करत आहेत. काही शेतकऱ्यांनी ओढ्या नाल्याचे पाणी आडवून, ते पाणी भातशेतीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जवळजवळ पावसाने पाठ फिरवून महिनाभराचा कालावधी उलटत आला असून, शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. भातपिकांच्या अत्यंत गरजेसाठी पावसाच्या अर्धा एक तास जरी सरी बरसल्या. तरी बहुतांशी पिके शेतकऱ्यांच्या हाताला लागतील. अशी आशा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यंदा समाधानकारक उत्पादन हाती येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, सप्टेंबरमध्ये पावसाची अनियमितता आणि ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून जाणवणारी उकडीप यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यंदा उत्पादनात निश्चित घट होणार असल्यामुळे वर्षभराची धान्याची गरज शेतकऱ्यांना भासविणे कठीण होऊन जाणार असल्याची व्यथा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तालुक्यातील कृषी विभाग व महसूल खात्याने तालुक्यातील बाधित शेतीची पाहणी करून पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन खरीप हंगामी शेतीच्या नुकसानीबाबत आवश्यक उपाययोजना निश्चित कराव्यात. अशी अपेक्षा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतीवर संकटाची कुऱ्हाड
नैसर्गिक आपत्तीमुळे उरणच्या भात शेतीवर संकटाची कुऱ्हाड कोसळली असून भाताचे कोठार असलेल्या उरण तालुक्यातील भातशेती धोक्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल. याची खात्री पटू लागली आहे.
Exit mobile version