शेतकरी हवालदिल ; आठवडाभरात पाऊस न झाल्यास पिकांवर रोगाची भीती
| उरण | वार्ताहर |
जुलै महिन्यात जोरदार बरसल्याने शेतकऱ्यांनी भातलावणीची कामे पूर्ण केली. मात्र, ऑगस्ट महिना संपत आला तरी शेतीसाठी आवश्यक असा पाऊस पडलेला नाही. पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेती अडचणीत आली असून, कडक उन्हामुळे भातपीक सुकू लागले आहे. जिल्हाभरात जवळपास 95 हजार हेक्टर भातशेती क्षेत्र आहे. परंतु, सुरुवातीपासूनच पावसाच्या लपंडावामुळे आधीच पाण्याअभावी भातरोपे करपल्याने पन्नास टक्के क्षेत्रच लागवडीखाली आले असताना, पुढील आठवडाभरात पाऊस झाला नाही, तर उरलीसुरली शेतीही हातची जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. भातपिकावर रोगराईचा प्रादुर्भावर होण्याची शक्यता दाट असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
सलग महिनाभर पावसाचा लपंडाव सुरू झाल्याने उरण तालुक्यातील दीड ते दोन हजार हेक्टर जमिनीवरील भातपिके संकटात आली आहे. यातील पन्नास टक्के पीक नष्ट झाले आहे. तर, येत्या आठवड्याभरात जोरदार पाऊस न झाल्यास संपूर्ण शेतीच शेतकऱ्यांच्या हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पावसाच्या लपंडावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
उरण तालुक्यात ऑगस्ट 2022 च्या तुलनेत आतापर्यंत सरासरी 2 हजार 236 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये ऑगस्ट 2022 मध्ये 1 हजार 714 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्याचप्रमाणे ऑगस्ट 2022 मध्ये 362 मिलीमीटर, मात्र आतापर्यंत अवघ्या 93 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाअभावी उरण तालुक्यातील भातशेती संकटात आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
उरण तालुका हा औद्योगिक तालुका बनला आहे. त्यामुळे येथील शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी उरणच्या चिरनेर, खोपटे, कोप्रोली, विंधणे, रानसई, वशेणी, पुनाडे, सारडे, कडापे, आवरे, पाले, पिरकोन, वेश्वी, गोवठणे, बोरखार, मोठी जुई, कळंबुसरे, नागाव, केगाव, चाणजे, मोठे भोम आदी गावांत भातशेतीचे पीक घेतले जात आहे. हे साधारण 2 हजार 500 हेक्टरपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांशी शेती ही खाडी किनाऱ्यावर आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी शेतीत शिरून शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर, येथील विविध उद्योगांमुळे शेतीतील पाण्याच्या नैसर्गिक वाटाच बंद केल्याने काही शेती नापिकी होत आहे. अशा सर्व संकटांचा सामना करीत उरणमधील शेतकरी मेहनतीने व नेटाने शेती करीत आहे. त्यात पावसाने महिन्यापासून लपंडाव सुरू केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
उरण तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे भातशेती आहे. सध्या पावसाच्या लपंडावामुळे खाडी किनाऱ्यावरील भात शेती धोक्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस न पडल्यास भातशेतीवर रोगराईचे संकट उभे राहणार असून, पावसाअभावी भातशेती नष्ट होणार आहे. तरी पाऊस पडणे गरजेचे आहे.
बबन ठाकूर, शेतकरी