प्रतिक्विंटल 2200 रुपयांचा भाव मिळणार
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथे भाताची हमी भावाने खरेदी करण्याच्या केंद्राचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी यांना महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशनकडून केंद्र देण्यात आले असून, पहिल्या दिवशी बळी बाळू बाबू हिलाल यांनी आपले भात खरेदी केंद्रावर पहिल्या क्रमांकावर विकले. दरम्यान, मार्केटिंग फेडरेशनकडून भाताची साठवण करण्यासाठी गोणी देण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र स्टेट को ऑप मार्केटिंग फेडरेशन आणि जिल्हा पणन कार्यालय यांच्याकडून जिल्ह्यात भाताची हमी भावाने खरेदी केली जाते. त्यासाठी आधारभूत भात खरेदी केंद्र नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी यांना देण्यात आला आहे. या केंद्रावर 16 डिसेंबरपासून भाताची हमी भावाने खरेदी सुरू करण्यात आली. नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या खांडा येथील गोडाऊनमध्ये भाताची हमी भावाने खरेदी सुरू झाली. त्यासाठी बाळू बाबू हिलाल यांनी आणलेले भाताचे वजन करून हमी भाव भात खरेदी केंद्राची सुरुवात झाली. यावर्षी भाताच्या अ दर्जाच्या घानाला 2202/- तर साधारण दर्जाच्या 2183/- रुपयांचा भाव निश्चित करण्यात आला आहे. भाताची हमी भावाने विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे उतारे, ई-पीक पाहणी उतारा यांच्यासह ऑनलाईन नोंदणी करायची आहे.
नेरळ येथील भाताच्या हमी भावाने खरेदी केंद्राचे उद्घाटन वजन काट्याचे पूजन करून करण्यात आले. त्यावेळी हभप शांताराम धुळे यांनी पुष्पहार घालून वजन केले, तर नंतर श्रीफळ वाढवून या केंद्राचे अधिकृत उद्घाटन नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र विरले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू कालेकर, नेरळ सोसायटीचे संचालक वैभव भगत, धोंडू आखाडे, सावळाराम जाधव, शशिकांत मोहिते, नारायण तरे, यशवंत कराळे आदी उपस्थित होते.त्याचवेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी यावेळी उपस्थित होते. सोमवारपासून ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणी क्रमांकनुसार आपले भात केंद्रावर आणता येणार आहे.
गोणी नसल्याने अडचण
शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाताची साठवण करण्यासाठी गोणी दरवर्षी जिल्हा पणन विभाग यांच्याकडून पुरविण्यात येतात. यावर्षी जिल्ह्यात अनेक ठिकाणी केंद्र सुरू होऊनदेखील भाताची खरेदी करण्यासाठी गोणी उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात भरून आणलेल्या गोणी या केंद्रावरून परत मिळणार नाही. याबाबत शेतकऱ्यांनी खबरदारी घेऊन चांगल्या गोणींमध्ये भात आणावा आणि संस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन नेरळ सोसायटीचे चेअरमन राजेंद्र विरले यांनी केले आहे.
