दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर रविवारी रात्रीपासून झालेल्या दमदार पावसामुळे पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतांमध्ये मुबलक पाणी साचल्याने रखडलेली भातलावणी पुन्हा वेगाने सुरू झाली असून, ग्रामीण भागात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये पहाटेपासूनच शेतकरी कुटुंबे भातलावणीच्या कामात गुंतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महिला-पुरुष शेतकरी चिखलात उतरून पारंपरिक पद्धतीने भाताच्या रोपांची लागवड करत असून, शेतांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळीच झालेल्या पावसामुळे भात पिकाच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, यंदा समाधानकारक उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन भातलावणीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागानेही केले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे नदी, नाले आणि तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, भूजल पातळी सुधारण्यासही मदत होणार आहे. दमदार पावसामुळे खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली असून, पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
