कंदमुळे विक्रीतून आदिवासींना हक्काचा रोजगार

मागील वर्षीपेक्षा भाव वाढले

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

जंगल व डोंगर रांगांनी वेढलेल्या रायगड जिल्ह्यात सध्या आरोग्यदायी विविध कंदमुळांचे भरघोस उत्पादन मिळत आहे. सध्या सर्वच बाजारपेठेत कणक, करंदे, चाई, आळू, वरा, लोंढी व रताळी आदी कंदमुळांची विक्री आदिवासी बांधव करत आहेत. मागील वर्षीपेक्षा किलोमागे 10 ते 20 रुपये भाव वाढले आहेत. मात्र, खवय्ये आवर्जून खरेदी करतात. आदिवासींना यातून रोजगारदेखील मिळत आहे.

आदिवासीवाड्यांवर त्यामध्ये बहुतांश ठाकूरवाड्यांवर घराशेजारील परसबागेत, माळरानावर व डोंगरावर कंदमुळांचे उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी 40 ते 50 रुपये किलोने मिळणारे कणक, करंदे, चाई, वारा, आळू, लोंढी, रताळी आदी कंदमुळे यंदा 60 ते 70 रुपये किलोने मिळत आहेत. आताच हंगाम सुरू झाल्याने किमती वाढल्या आहेत. मात्र, काही दिवसांनी या किमती कमी होतील, असे लक्ष्मी लेंडी या कंदमूळ विक्रेत्या महिलेने सांगितले. तर, मध्य प्रदेशमधून जिल्ह्यात येणारे ॲड. चंद्रहास खेडकर म्हणाले की, या हंगामात मिळणारे हे आरोग्यवर्धक विविध कंदमुळे आवर्जून खातो. शिवाय, येथून घरी घेऊन जातो. नातेवाईकांनादेखील भेट म्हणून देतो.

आरोग्यवर्धक व चविष्ट
कंदमुळे साधारण चवीला गोड व रुचकर असतात. या कंदमुळांचे आयुर्वेदिक उपयोगही आहेत. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते. शरीरात रक्ताची वाढ होते. शरीरातील कार्यशक्ती वाढते. विविध व्हिटॅमिन्स व कर्बोदके असतात. शरीराला ऊर्जा मिळते. अशा विविध दृष्टीने ही कंदमुळे गुणकारी आहेत. बहुतांश जण ही कंदमुळे उकडून, तर काही जण भाजून खातात. काहीजण याची भाजीदेखील बनवून खातात.

जिल्ह्यातील आदिवासी बांधव आपल्या घराशेजारी व डोंगरावर कंदमुळे लावतात. या कंदमुळे विक्रीतून आदिवासींना हक्काचा रोजगार मिळतो. परिणामी, त्यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात थांबते. या सर्व मालाला आणखी चांगली किंमत व मोठी बाजारपेठ मिळाली पाहिजे. वाहतुकीची स्वस्त व्यवस्था केली पाहिजे. यातून आदिवासींचे जीवनमान अधिक चांगले उंचावू शकेल.

शरद गोळे
प्रयोगशील शेतकरी, शिळोशी, सुधागड
Exit mobile version