| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील पोटलज (खुर्द) येथील मतीमंद महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी सदानंद काशिनाथ कदम (63) यांना दोषी ठरवण्यात आले आहे. याबाबतची सुनावणी सोमवारी (दि.17) माणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात पार पडली. या सुनावणीत सदानंद कदम यांना 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच पीडितेला 1 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या घराच्या पायऱ्यांवर बसलेली असताना सदानंद कदम यांनी तिच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा घेत तिला बंद घराच्या व्हरांड्यात नेले. तेथे आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता. सोमवारी माणगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाने केलेल्या सुनावणीत सदानंद कदम यांना 10 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच, दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येक कलमानुसार 3 महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. याशिवाय पीडितेस 1 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे यांनी केला. सरकारी वकील जे. डी. म्हात्रे यांनी सरकारच्यावतीने बाजू मांडली. त्याचबरोबर पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष माने यांनी न्यायालयीन कामकाजात पाठपुरावा केला. या संपूर्ण प्रकरणाच्या तपास व न्यायालयीन प्रक्रियेत तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांचे मार्गदर्शन लाभले.
बलात्कार प्रकरणी सश्रम कारावास
