रिंकूने पळविला गुजरातचा विजय

शेवटच्या षटकात ठोकले पाच षटकार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गुजरात टायटन्सने विजयासाठी ठेवलेल्या 205 धावांचा पाठलाग करताना केकेआरने झुंजार खेळ करत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. केकेआरचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंहने शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज होती त्यावेळी सलग पाच षटकार मारत सामना जिंकून दिला. रिंकूने 21 चेंडूत नाबाद 48 धावा चोपल्या. तर, व्यंकटेश अय्यरनेदेखील 82 धावांची झुंजार खेळी केली. तत्पूर्वी, गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणार्‍या राशिद खानचा हा निर्णय गुजरातच्या फलंदाजांनी योग्य ठरवला.

मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज साई सुदर्शनने 38 चेंडूत 53 धावा ठोकल्या. तर विजय शंकरने स्लॉग ओव्हरमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत 21 चेंडूत अर्धशतक ठोकण्याची किमया केली. त्याने 24 चेंडूत केलेल्या नाबाद 63 धावांच्या जोरावर गुजरातने 20 षटकात 4 बाद 204 धावा केल्या. या खेळीत विजय शंकरने 5 षटकार आणि 4 चौकार मारले. 82 धावांची खेळी करणार्‍या अय्यरने गुजरातचा बीपी वाढवला होता. मात्र नितीश राणाला बाद करणार्‍या अल्झारी जोसेफने अय्यरचा अडसर दूर केला. पाठोपाठ कर्णधार राशिद खानने 17 व्या षटकात पहिल्या चेंडूवर आंद्रे रसेल, दुसर्‍या चेंडूवर सुनिल नरेन आणि तिसर्‍या चेंडूवर शार्दुल ठाकूरला बाद करत हॅट्ट्रिकसह केकेआरचे पॉवर हाऊस निकामी केले.

गुजरातचे 205 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात खराब झाली. रेहमनुल्ला गुरबाज 15 तर एस जगदीशन 5 धावांची भर घालून परतला. मात्र त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांनी केकेआरचा डाव सावरत संघाला 10 षटकात 86 धावांपर्यंत पोहचवले. थ्रिडी प्लेअर म्हणून ओळख असलेल्या विजय शंकरने केकेआर विरूद्ध 24 चेंडूत तडाखेबाज 63 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने केकेआरसमोर 204 धावांचा डोंगर उभारला.

Exit mobile version