। लखनौ । वृत्तसंस्था ।
आयपीएलचा 26 वा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने लखनौचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
पंतने दिल्ली कॅपिटल्ससाठी या सामन्यादरम्यान 3 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. लखनौविरुद्धच्या सामन्यापूर्वी रिषभला हा विक्रम पूर्ण करण्यासाठी फक्त 9 धावांची गरज होती. या सामन्यात त्याने 24 बॉलमध्ये 41 धावा काढत हा विक्रम पूर्ण केला आहे. त्याने यावेळी खेळताना 4 फोर आणि दोन सिक्स मारले. दिल्लीसाठी 3 हजार धावा पूर्ण करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू बनला आहे. दिल्लीसाठी सर्वात जास्त धावा करण्याच्या यादीत डेविड वॉर्नर दूसर्या स्थानावर आहे. त्याने 87 सामन्यात 2,549 धावा केल्या आहेत, तर कर्णधार रिषभ पंतने 104 सामन्यांत 3,032 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा तर 17 अर्धशतकांचा समावेश आहे.
ऋषभ पंतचा मोठा कारनामा
