| पणजी | वृत्तसंस्था |
महाराष्ट्राच्या ऋषभ दासने पुरुषांच्या 50 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्वतःची पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. याचप्रमाणे मिश्र रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळाले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणात शुक्रवारी तीन रौप्यपदके कमावली.
ऋषभने ही शर्यत 26.66 सेकंदांत पूर्ण केली. कर्नाटक संघाचा श्रीहरी नटराजने (25.77 सेकंद) सुवर्णपदक जिंकले. ऋषभने याआधी या स्पर्धेत 100 मीटर बॅकस्ट्रोक व 200 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. ऋषभ हा ठाणे येथे ज्येष्ठ प्रशिक्षक गोकुळ कामत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. महाराष्ट्र संघाने चार बाय 100 मीटर मिश्र रिले शर्यतीत रौप्यपदक पटकावले. मित मखिजा, अवंतिका चव्हाण, ऋजुता खाडे व वीरधवल खाडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने ही शर्यत 3 मिनिटे, 42.61 सेकंदांत पार केली. कर्नाटक संघाने हेच अंतर 3 मिनिटे, 38.24 सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले.
डायव्हिंगमध्ये ऋतिकाचे यश महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील डायव्हिंग या खेळामध्ये एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात रौप्यपदक जिंकताना पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तिने 151 गुण नोंदवले. या स्पर्धेमध्ये तिने या अगोदर एक रौप्य व एक ब्राँझपदक जिंकले होते. ऋतिका ही सोलापूरची खेळाडू असून तिचे पती हरिप्रसाद हेदेखील आंतरराष्ट्रीय डायव्हिंगपटू आहेत. रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या ऋतिकाला तीन वर्षांचा मुलगा असूनही ती नियमितपणे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत आहे.