ऋषी सुनक बनले ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान

। लंडन । वृत्तसंस्था ।

ऋषी सुनक ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनले आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या व्यक्तीची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. सुनक यांना सर्वाधिक खासदारांचा पाठिंबा मिळाला असून त्यांनी नवा इतिहास रचला आहे.

सुनक हे 2015 मध्ये रिचमंड मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि 2017 आणि 2019 मध्ये ते पुन्हा निवडून आले. ऋषी सुनक हे यॉर्कशायरचे खासदार असले तरी भारत त्यांच्या हृदयात आहे. सुनक यांनी ब्रिटीश संसदेत भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती. असं करणारे ते ब्रिटनचे पहिले खासदार होते.

ऋषी सुनक यांचा जन्म हिंदू कुटुंबात 12 मे 1980 रोजी ब्रिटनमधील साउथॅम्प्टन जनरल हॉस्पिटलमध्ये झाला असून लहानपणापासूनच मंदिरात जाण्याची सवय आहे. सुनक यांनी त्यांच्या एका विधानात म्हटलं होतं की, भगवद्गीता अनेकदा तणावाच्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यास मदत करते.

ऋषी सुनक हे भारताचे जावई आहेत. सुनक त्यांची पत्नी आणि दोन मुलींसह बंगळुरूमध्ये सासरच्या मंडळींना भेटायला येत असतात.

तसेच ऋषी सुनक यांची गणना ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. त्याची एकूण संपत्ती 700 दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त आहे. त्यांचं ब्रिटनच्या यॉर्कशायरमध्ये घर असून त्यांची पत्नी अक्षता यांची केन्सिंग्टन, लंडनमध्येही मालमत्ता आहे.

Exit mobile version