| राबगाव-पाली | वार्ताहर |
वाकण-पाली महामार्गवर बरेच दिवस एक बंद अवस्थेत टँकर उभा आहे. या टँकरमुळे अपघाताचा धोका वाढला असून, तो टँकर महामार्गावरून तात्काला हटवावा, अशी मागणी प्रवासी वर्ग व वाहन चालकांकडून होत आहे.
वाकण-पाली महामार्गावर वाजरोली येथील वळणावर मागील तीन-चार दिवसांपासून एक टँकर बंद अवस्थेत पडलेला आहे. टँकर बंद पडलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूने वळणाचा रस्ता असून रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यास या मार्गावरील वाहने दिसत नाहीत. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक पोलिसांनी या बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन बंद टँकर रस्त्यामधून हटवावा. तसेच, या मार्गावर बंद पडलेली वाहने तासन्तास जागच्या जागीच दुरुस्त होईपर्यंत उभी असतात. त्यादरम्यान कोणतेही सिग्नल व सूचक फलक लावले जात नाहीत. केवळ झाडाच्या फांद्या अडकविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशी वाहने ही वाहनचालकांना दिसून येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने बंद पडलेली वाहने वेळीच बाजूला करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करावी, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.