| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावरोली-खारपाडा मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यातच आंबिवली येथील नव्या पुलाच्या पुढे इसांबा येथील मोरी खचल्यामुळे साईट पट्टीच्या भाग खचला आहे. रस्त्याखालची माती वाहून गेल्यामुळे या ठिकाणी मोठा खड्डा पडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसमोर अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
सावरोली-खारपाडा हा परिसरातील महत्त्वाचा संपर्क मार्ग असून या रस्त्यावरून दररोज लहान-मोठी वाहने, दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, कामगार तसेच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र, रस्ता खचल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात खड्डा स्पष्टपणे दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसामुळे रस्त्याखालची माती वाहून गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारची इशारा फलक किंवा सुरक्षेची व्यवस्था नसल्याने वाहनचालकांना अचानक खड्ड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी, वेळेत दुरुस्ती न झाल्यास या मार्गावर गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता स्थानिक ग्रामस्थांसह प्रवासी वर्गाकडून वर्तवली जात आहे.
मोरी खचल्यामुळे अपघाताचा धोका
